वैभव सुपर ओव्हरमध्ये लढला, पण संघ हरला; मुंबईकर सूर्यांश शेडगे चमकला, श्रीलंकेचा सुपर विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैभव सूर्यवंशी सुपर ओव्हरमध्ये जोरदार लढला, पण तरीही हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाला श्रीलंका ‘अ’कडून पराभव पत्करावा लागला. मुंबईकर सूर्यांश शेडगे या सामन्यात संघासाठी संकटमोचक ठरला. फलंदाज एकामागून एक धारातीर्थी पडत असताना त्याने 72 धावांची दिमाखदार खेळी साकारली. त्यामुळेच संघाला प्रथम फलंदाजी करताना 265 धावांपर्यंत तरी मजल मारता आली. श्रीलंकेचा डावही 265 धावांवर थांबला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये वैभवने धडाकेबाज फटकेबाजी केली, पण तरीही संघाला सात धावांनी पराभव पत्करावा लागला.

सूर्यांशने संघाला तारले…

हिंदुस्थानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला, पण दोन्ही सलामीवीर 39 धावांतच माघारी फिरले. वैभव सूर्यवंशीने यावेळी 14 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 21 धावा केल्या. त्यानंतर ठरावीक फरकाने हिंदुस्थानचे फलंदाज माघारी परतत होते, त्यामुळे डावाला स्थिरता मिळत नव्हती. पण सूर्यांशने यावेळी 66 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 72 धावा फटकावत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. सूर्यांशला यावेळी विपराज निगमची चांगली साथ मिळाली, त्याने 6 चौकारांच्या जोरावर 51 धावा केल्या.

श्रीलंकेला रोखण्यात यश…

श्रीलंकेने डावाची चांगली सुरुवात केली होती. त्यांच्याही सातत्याने विकेट्स पडत होत्या; पण सदीरा समरविक्रमाने सात चौकारांच्या जोरावर 93 धावांची खेळी साकारली. हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज अर्शद खानने सदीराला अखेरच्या षटकात बाद केले आणि संघाने गमावलेला सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला.

सुपर ओव्हरमध्ये काय घडलं…

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेची प्रथम फलंदाजी होती, तर अर्शद खान गोलंदाजी करत होता. या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने 16 धावा केल्या. हिंदुस्थानी संघाकडून वैभव आणि सूर्यांश ही जोडी फलंदाजीला उतरली, पण त्यांना 9 धावाच करता आल्या आणि त्यामुळेच पराभव स्वीकारावा लागला.

वैभवचा मैदानात जोरदार राडा…

वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेच्या खेळाडूबरोबर जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हिंदुस्थानची फलंदाजी सुरू असताना दोन्ही संघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. श्रीलंकेचा संघ एकत्र जमला होता. त्यावेळी श्रीलंकेचा जो खेळाडू वाद घालत होता त्याला वैभवने जोरात धडकल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर श्रीलंकेच्या एका खेळाडूने या दोघांनाही दूर लोटले आणि त्यानंतर वातावरण निवळले. या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.