
सामना प्रतिनिधी । नांदेड
‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सलग दहाव्या वर्षी राज्यभरातील विविध कलावंतांनी देशभक्तीपर गीते सादर करुन २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहीली. रवींद्र खोमणे, प्रथमेश मोरे, वर्धिनी जोशी हयातनगरकर, संगीता भावसार या गायकांनी गायिलेली एकापेक्षा एक सरस गीते सादर करुन देशभक्तीची भावना वृध्दींगत केली. संभाजीनगरच्या कलावंतांनी वेगवेगळे नृत्याविष्कार दाखवत यात आणखी भर घातली.
गेल्या दहा वर्षापासून पत्रकार विजय जोशी यांनी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडला. संवाद बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था नांदेडने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कुलगुरु उध्दव भोसले, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, लेखा व वित्त अधिकारी नीळकंठ पाचंगे, गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
सुरुवातीला भारतमातेचे व नटराजाचे पूजन करुन तसेच दिपप्रज्वलन करुन मान्यवरांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर २६/११ च्या हल्ल्यातील शहीद झालेल्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सर्वांनी श्रध्दांजली वाहिली. कार्यक्रमाची सुरुवात २६/११ च्या हल्ल्यातील काही थरारक दृष्य दाखवून करण्यात आली. यावेळी वातावरण धीर गंभीर बनले होते. वर्धिनी जोशी हयातनगरकर हिने गायिलेल्या ‘भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर तिने गायिलेल्या सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्था हमारा, देश मेरा रंगीला रंगीला या गितांनाही उपस्थित रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. रवींद्र खोमणे या प्रख्यात गायकाने गायिलेल्या ‘भारत हम को जान से प्यारा,’ ‘संदेशे आते है,’ ‘जिंदगी मौत ना बन जाये’ आणि ‘सुनो गौर से दुनियावालों ‘या गीतांना उपस्थितांनी चांगलेच डोक्यावर घेवून या कार्यक्रमाला वन्समोअर दिला.
श्रीरंग चिंतेवार यांनी गायिलेल्या ‘देखो वीर जवानों ‘या गिताने देखील वातावरण भावपूर्ण केले. संगीता भावसार यांनी गायिलेल्या’ ने मजसि ने,’ ‘दे दी हमे आझादी’, ‘जिस पथ पे चला’ या गीतांचाही रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. संभाजीनगरच्या आकाश मिसाळने या सर्व गीतांना दिलेली सुरेख साथ अप्रतिम होती. देशभक्तीच्या भावना वृध्दींगत व्हाव्यात व त्या जागृत व्हाव्यात यासाठी संभाजीनगरच्या रॉयल फॅमिली कलामंडलमने भांगडा व अन्य देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करुन प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.
देशभक्तीचा हा माहोल खऱ्याअर्थाने आणखी रंगतदार केला. तो जेजुरी जि. पुणेच्या प्रथमेश मोरेने. त्याने सेक्सॉ फोनवर वाजविलेल्या तीन वेगवेगळ्या रचनांनी वातावरण गहिवरुन गेले. संगीत सम्राटचा उपविजेता ठरलेल्या प्रथमेशने ‘ये मेरे वतन के लोगों,’ ‘जहाँ डाल डाल पर सोने की’ ही गाणी ताकदीने आपल्या वाद्यावर सादर केली. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचलन देवदत्त साने यांनी केले. तर संबंध कार्यक्रमाचे निवेदन प्रख्यात निवेदक महेश अचिंतलवार व श्रध्दा देवचके यांनी केले. देशभक्तीपर रचना सुरु असताना रसिक, प्रेक्षकांतून वेळोवेळी ‘भारत माता की जय’चा जयघोष सुरु होत होता. महाराष्ट्रातील जवळपास चाळीस कलावंतांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. शेवटी विजय जोशी यांच्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. थंडीचे दिवस असताना देखील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह खचाखच भरले होते.






























































