
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे ‘बाबरी’ची प्रतिकृती बांधण्याचा प्रस्ताव ठेवल्याबद्दल तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) गुरुवारी आमदार हुमायूं कबीर यांना पक्षातून निलंबित केले. कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांच्या म्हणण्यानुसार, या आमदाराला यापूर्वीही त्यांच्या वक्तव्याबद्दल ‘इशारा’ देण्यात आला होता.
महापौर फिरहाद हकीम म्हणाले, ‘मुर्शिदाबादमधील आमच्या एका आमदाराने अचानक बाबरी बांधण्याची घोषणा केल्याचे आमच्या निदर्शनास आले. अचानक बाबरीच का? आम्ही त्यांना यापूर्वीच त्यांना इशारा दिला होता. आम्हाला धर्मनिरपेक्ष सिद्धांतांवर (secular theory) विश्वास आहे. पक्षाच्या निर्णयानुसार, आम्ही आमदार हुमायूं कबीर यांना निलंबित करत आहोत’.
आमदार कबीर यांनी ६ डिसेंबर रोजी बेलडांगामध्ये ‘बाबरी’ची पायाभरणी करण्याची आपली योजना उघड केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते शुक्रवारी तृणमूलचा राजीनामा देणार असून, स्वतःचा पक्ष स्थापन करून बाबरीची प्रतिकृती बांधण्याची मागणी सुरू ठेवणार असल्याचे कळत आहे.
भाजपवर ‘फोडाफोडीचे राजकारण’ केल्याचा आरोप
‘फोडाफोडीचे राजकारण (divisional politics) करण्याचे हे भाजपचे धोरण आहे’, असा आरोप करत कोलकाताचे महापौर म्हणाले, ‘६ डिसेंबरची तारीख का निवडली? कबीर यांनी दुसरे नाव का निवडले नाही? ते मुर्शिदाबादमध्ये शाळा किंवा महाविद्यालय बांधू शकले असते. धार्मिक बाबींवरून बंगालमध्ये फूट पाडण्याचे हे भाजपचे धोरण आहे, असे आम्हाला वाटते. भाजपला फोडाफोडीच्या राजकारणावर विश्वास आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचा पत्ता वापरला आहे. मला वाटते की कबीर या फोडाफोडीच्या राजकारणात सामील झाले आहेत.’
एनडीटीव्हीने सूत्रांच्या आधारे वृत्त दिले आहे की, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी कबीर यांच्या वक्तव्यावर ‘अत्यंत नाराज’ होत्या. त्या स्वत: आणि पक्ष या मशीद बांधणीच्या कृतीला समर्थन देणार नाहीत, हा संदेश भरतपूरच्या आमदाराला कळवण्यात आला होता.
राज्यपालांकडून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न
बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी राज्य सरकारला विचारणा केली आहे की, जर कबीर यांचे वक्तव्य कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण करत असेल, तर त्यांना अटक का केली जात नाही? ते म्हणाले, ‘मला गुप्तचर संस्था आणि स्थानिक मतदारांकडून मिळालेल्या अहवालांनुसार, कोणीतरी जाणूनबुजून मुर्शिदाबादला घोटाळ्याचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे. याला परवानगी दिली जाणार नाही. जर जातीय भावना भडकावल्या गेल्या, तर राज्य आणि सरकार बघ्याची भूमिका घेणार नाहीत’.
निलंबनाची घोषणा झाल्यानंतर काही मिनिटांतच, कबीर यांनी मतदार यादीच्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) विरोधात मुर्शिदाबाद जिल्ह्यात होणाऱ्या बॅनर्जी यांच्या रॅलीतून माघार घेतली.
भाजपची टीका
भाजपचे प्रवक्ते प्रातुल शाह देव यांनी कबीर यांच्यावर टीका करताना म्हटले की, अशा वक्तव्यांमुळे ‘जातीय तणाव निर्माण’ होतो.
ते आव्हान देत म्हणाले, ‘माझे त्यांना आव्हान आहे की, जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुर्शिदाबादमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये कुठेही बाबरी मशिदीसारखी रचना बांधण्याचा प्रयत्न करून दाखवावा. जातीय तणाव निर्माण करण्यासाठीच अशी विधाने केली जात आहेत. बाबर, अकबर, शाहजहान किंवा औरंगजेब यांच्या नावाने स्मारक उभारले, तर त्याचे परिणाम अनिवार्यपणे बाबरी प्रकरणी तोंड द्यावे लागलेल्या त्याच प्रकारच्या वादाकडे जातील’.




























































