एका रात्रीत ट्रक ड्रायव्हर झाला करोडपती, लागला जॅकपॉट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

कोणाचं नशीब केव्हा, कसं फळफळेल सांगता येत नाही. असंच काहीसं अमेरिकेतल्या एका ट्रक ड्रायव्हरच झालं आहे. डेव्हीड जॉन्सन (56) असे त्याचे नाव असून त्याला एक, दोन नाही तर चक्क दोन हजार कोटींहून अधिक रुपयांची न्यूयॉर्क लॉटरी लागली आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या इतिहासात सर्वात मोठा जॅकपॉट जिंकल्याचा दावा त्याने केला आहे. एवढी मोठी रक्कम जिंकल्यामुळे मी खूप आनंदात असून यापुढे कामच करणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.

जॉन्सन यांनी 26 डिसेंबर 2018 रोजी लॉटरी गेम खेळले होते. त्याचा क्रमांक 5-25-38-52-67 असा होता आणि पॉवरबॉल 24 साठी त्यांनी रोख रक्कमेचा पर्याय निवडला. यामुळे जिंकलेल्या पैशातून सर्व प्रकारचे कर कापून त्याला 8,08,26,000 रुपये देण्यात आले. एवढे पैसे आपण जिंकलो यावर विश्वासच बसत नसल्याचे जॉन्सनने म्हटले असून अतिआनंदामुळे आपली तहानभूकचं हरपल्याचे त्याने सांगितले आहे.

मूळ ब्रोकलीन येथे राहणारे जॉन्सन वयाच्या 16 व्या वर्षी जमैकाहून अमेरिकेत आले होते. ते एका पेट्रॉल पंपापासून रस्ता साफ करण्याचेही काम करू लागले. काही दिवसांपूर्वी गंमत म्हणून त्यांनी पंपावरील स्टॉलवर न्यूयॉर्क लॉटरी खरेदी केली होती. पण नंतर कामात आपण लॉटरी घेतल्याचे ते विसरून गेले होते. शुक्रवारी त्यांच्या एका मित्राने लॉटरी जाहीर झाल्याचे व पेट्रॉल पंपावरील स्टॉलवरून लॉटरी घेणाऱ्या व्यक्तीला ती लागल्याचे सांगितले. पेट्रोल पंपावरून अनेकजण लॉटरी घेत असल्याने जॉन्सने त्याकडे दुर्लक्ष केले. पण तरीही कुतूहल म्हणून त्याने तिकीटावरील क्रमांक लॉटरी जिंकलेल्या क्रमांकाबरोबर जुळवून पाहिला असता तो त्यांचाच लॉटरी क्रमांक असल्याचे समोर आले.