
हिंदुस्थान आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील मुक्त व्यापार करारावर (FTA) अमेरिकेने तीव्र आक्षेप घेतला आहे. हिंदुस्थानसोबत ‘मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स’ करून युरोप स्वतःविरुद्धच युद्ध पुकारणाऱ्या शक्तींना आर्थिक बळ देत आहे, असा इशारा ट्रम्प प्रशासनाने दिला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी या करारावर टीका केली असून या करारांमुळे अमेरिकेचा थयथयाट सुरू असल्याचेच पाहायला मिळत आहे.
स्कॉट बेसेन्ट यांच्या मते, युरोप जरी रशियासोबतचे थेट ऊर्जा संबंध तोडल्याचा दावा करत असला, तरी ते हिंदुस्थानकडून शुद्ध केलेले रशियन तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे रशिया-युक्रेन युद्धाला अर्थपुरवठा करत आहेत.
अमेरिकेने घेतलेले काही आक्षेप
रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने हिंदुस्थानवर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क (Tariff) लादले आहे.
अमेरिका रशियाच्या ऊर्जा व्यापाराला खिळ घालण्यासाठी मोठे त्याग करत असताना, युरोप मात्र ‘पळवाटां’चा फायदा घेत हिंदुस्थानसोबत व्यापार करार करत आहे.
‘रशियाचे कच्चे तेल हिंदुस्थानात जाते, तिथे त्यावर प्रक्रिया होते आणि तेच उत्पादन युरोप खरेदी करते. या माध्यमातून युरोप स्वतःविरुद्धच्या युद्धालाच रसद पुरवत आहे’, असे बेसेन्ट यांनी ‘एबीसी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
हिंदुस्थान-EU व्यापार करार
२००७ पासून प्रलंबित असलेल्या या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अखेर पूर्ण झाल्या असून, आज (मंगळवारी) त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन या हिंदुस्थानच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या कराराला जागतिक व्यापारातील एक ऐतिहासिक पाऊल मानले आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या या विधानामुळे आता हिंदुस्थान, अमेरिका आणि युरोप यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
europe financing war against itself with india-eu deal: team trump
us treasury secretary scott bessent warns europe over india-eu free trade agreement, citing indirect purchase of russian oil products.























































