
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा गूगल, फेसबुक, ट्विटरला झापले आहे. त्यातही ट्रम्प यांनी गूगलवर विशेष नाराजी व्यक्त केली आहे. गूगलवर ‘Idiot’ सर्च केल्यावर माझा फोटो येतो. माझ्याबद्दल नकारात्मक वृत्तचं या सोशल साईट दाखवलं जात आहेत. पण ते कोणाबरोबर शत्रुत्व घेत आहेत याबद्दल त्यांना माहित नाहीय, अशी धमकीवजा सूचनाही ट्रम्प यांनी गूगल व फेसबुकला दिली आहे.
गूगलवर रिपब्लिकन पक्षाबद्दल जाणीवपूर्वक चुकीची माहिती देण्यात येत आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. तसेच गूगलवर ट्रम्प शब्दाशी निगडीत बातम्या सर्च करताच माझ्या विरोधातील नकारात्मक बातम्या वाचायला मिळतात. ‘फेक न्यूज’ला उत्तेजन देण्याचंच हे कारस्थान असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. गूगलवर फक्त सीएनएनच्या बातम्यांनाच प्रसिद्धी दिली जाते, असेही ते म्हणाले.
अमेरिकेतील वृत्तसंस्था शिकागो ट्रिब्यूनने देखील ट्रम्प यांच्या आरोपांमागचं तथ्य शोधलं असता ट्रम्प खरे बोलत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या संशोधनानुसार टि्वटरवर “dumb presidential tweets सर्च केल्यास त्यावरही फक्त ट्रम्प यांचेच ट्वीट दिसतात. त्याचबरोबर “president Russian hookers”सर्च केल्यावर ट्रम्प यांचेच फोटो दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान गूगल सर्च केल्यावर मिळणारी माहिती ही एलगोरिदम ठरवतं. प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, वस्तूवर संशोधन केल्यानंतरच त्याच्याशी संबंधित माहिती गूगल देतं, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.






























































