नगर – मनमाड महामार्गावर अपघातात विद्यार्थीनीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

नगर मनमाड महामार्गावरील येवला नाक्यावर टँकर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलीचा काका यात गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. आफरीन आजमेर पठाण (२०, रा. समता नगर, कोपरगाव ) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. तर, हुरखा बुढणखा पठाण (४० रा.शारदानगर, कोपरगाव) असे तिच्या काकांचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आफरीन डि एड करत होती. गुरुवारी ती काकांबरोबर दुचाकीवरुन परीक्षा देण्यासाठी नगर – मनमाड महामार्गाने बाभळेश्वर येथे जाण्यासाठी निघाली होती. ते येवला नाका परिसरात पोहचले असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने (क्र. एचआर.६१ सी. ९२७७) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे हुरखा व आफरीन रस्त्यावर पडले. त्यादरम्यान, टँकर आफरीनच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर हुरखा गंभीर जखमी झाले.

अमजद हसन शेख यांनी याने टँकर चालकाविरोधात फिर्याद दाखल केली असून, कोपरगाव शहर पोलिसांनी टँकर चालक पुष्करसिंग लक्ष्मणसिंग मोहरा २५ (रा. उत्तराखंड ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आता या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नंदकिशोर काते करीत आहेत.