
जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. या हल्ल्यातून एकूण 26 पर्यटक ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रत्येक जण मिळेल ते साधन घेऊन परतीचे वाट पकडत आहे. मात्र महाराष्ट्रातीलच दोन महिला पर्यटकांनी जम्मू-कश्मीर येथून कटू आठवणी घेऊन घरी परतण्यास नकार दिला आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पर्यटक कश्मीरला जायला तयार नाहीत. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी आपले बूकिंगही रद्द केले आहे. याचा फटका जम्मू-कश्मीर मधील पर्यटन व्यावसायालाही बसणार आहे. अशातच महाराष्ट्रातील दोन महिलांना मात्र कश्मिरींवर विश्वास ठेवा असे म्हणत कटू आठवणी घेऊन घरी परतण्यास नकार दिला आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी आम्हाला परतीचे तिकीट बूक करा आणि पुन्हा नंतर कधीतरी परत या असे सांगितले. कारण जे काही घडले ते भयानक होते. पण आम्हाली भीती वाटत नव्हती. आम्ही पहलगाम सोडत असलो तरी कश्मीर सोडत नाही आहोत, असे एका महिलेने सांगितले.
तर दुसरी महिला स्थानिक रहिवाशांच्या आदरतिथ्याने भावूक झाली होती. येथील स्थानिक रहिवाशांवर आमचा विश्वास आहे. या हल्ल्यानंतर ते ज्या पद्धतीने आमच्याशी वागले, त्यामुळे त्यांनी आमचा विश्वास संपादन केला आहे. त्यांनी आम्हाला नेहमी मदत केली. सुरुवातीपासून आमच्यासोबत असलेल्या चालकानेही हॉटेल सोडेपर्यंत आम्हाला आमचा धर्म विचारला नाही. हल्ल्यानंतरही त्याने स्वत:च्या सुरक्षेला प्राधान्य न देता, आम्हाला प्राधान्य दिले. हे ठिकाण खूप सुंदर असून आम्ही प्रवास करत राहू, असे ती म्हणाली.