
राज्यातील औषध विक्रेत्यांनी उद्या बंद पुकारलेला असतानाच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज तुकाराम मुंढे यांच्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.
काही आठवडय़ांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी बदली होऊन रुजू होण्याची संधी न मिळालेले तुकाराम मुंढे हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आपत्ती व्यवस्थापन विभागात बदली होण्यापूर्वी मुंढे हे दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत होते. या विभागात तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय लाभ लाटणाऱ्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंढे यांना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात नियुक्ती देण्यात आली आहे.



























































