
सामना प्रतिनिधी । मुंबई
नाशिक महापालिका आयुक्तपदावरून थेट मंत्रालयातील नियोजन विभागात बदली झालेले तुकाराम मुंढे यांची महिनाभरातच बदली करण्यात आली आहे. नियोजन विभागातील नियुक्ती न स्वीकारल्याने त्यांना आता मंत्रालयातून वडाळ्याच्या एडस् नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कायम वादग्रस्त ठरत असलेल्या मुंढे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.
मुंबईतील नियोजन विभागाच्याच सहसचिवपदी वर्णी लागल्यानंतरही तुकाराम मुंढे यांनी ही नियुक्ती स्वीकारली नव्हती. त्यामुळे त्यांची आता मुंबई एडस् नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी 2010 आणि 2012 मध्ये त्यांची बदली झाली होती. गेल्या 12 वर्षांत त्यांची ही तेरावी बदली आहे.
आणखी तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या
शिर्डी संस्थानचे सीईओ रुबल प्रखेर-अगरवाल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे साई संस्थानचा सीईओपदाचाही अधिभार कायम ठेवण्यात आला आहे. तर पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेल्ही-उगले यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ‘एनआरएमडीए’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचा कार्यभारही सोपविण्यात आला आहे. बालाजी मंजुळे यांची अपंग कल्याण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

























































