
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या चांदीच्या मुकुटासह प्रभावळ, त्रिशूळ तसेच मोत्याचे दागिने गायब असल्याचे मंदिर संस्थानच्या वतीने पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यात काही सोन्याच्या तुकडय़ांचाही समावेश आहे.
तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान दागदागिन्यांच्या चोरी प्रकरणात जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसीलदार सोमनाथ माळी यांना नेमण्यात आले. माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात चार महंत, धार्मिक व्यवस्थापक, सेवेदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सोमनाथ माळी यांनी दिलेल्या तक्रारीत सात क्रमांकाच्या डब्यातील रेशमासह असलेला चांदीचा मुकुट गायब असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता. एक ते सात क्रमांकाच्या डब्यातील 17 अलंकार गायब झाले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार महंतांपैकी तीन मृत असून महंत चिलोजीबुवा हे एकमेव सध्या हयात आहेत. धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले हे देखील हयात नाहीत. तक्रारीत केवळ ‘पलंगे’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नेमके पलंगे कोण, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला आरोपी हजर
तुळजाभवानीच्या दागिने चोरी प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, नेमके त्याच वेळी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या तयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या बैठकीला दागिने चोरीचा आरोप असलेले महंत चिलोजीबुवा देखील उपस्थित होते.
गायब झालेले दागिने
एक नंबरच्या डब्यातून जडावी मोत्यासह मंगळसूत्र, जडावी मोत्यासह कानजोड, मोत्यासह छत्रजडावी, छोटा माणिक, नेत्रजोड तर दोन क्रमांकाच्या डब्यातून सहा माणिक जडवलेली नेत्रजडावी, तिसऱ्या डब्यातून मंगळसूत्र वाटीतील माणिक, माणिक असलेली नेत्रजडावी, चौथ्या डब्यातून चांदीचे खडाव, पाचव्या डब्यातूनही चांदीचे खडावजोड, सहाव्या डब्यातून मोत्याची नथ, बारा पदर, अकरा पदर पुतळय़ाची माळ, सोन्याचे मंगळसूत्र, सातव्या डब्यातून चांदीचे शेवंतीचे फूल, सहा मोती, सोन्याचे तुकडे, सोन्याची जडावी असलेली तानवटे, हिरवे पाचू असलेला माचपट्टा आणि चांदीचा मुकुट.



























































