
सोमवारी सकाळी झालेल्या प्रलयकारी भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये हाहाकार उडाला आहे. भूकंपामुळे इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या असून याखाली दबून आतापर्यंत 4500हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालीही अनेक लोक अडकलेले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तब्बल 7.8 रिश्टर स्केलच्या शक्तीशाली भूकंपामुळे तुर्कीमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याने तेथील सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, या भूकंपानंतर हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देश तुर्कीसह सीरियाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. हिंदुस्थाननेही एनडीआरएफचे पथक तुर्कीला पाठवले आहे. यासह वैद्यकीय मदतही हिंदुस्थानने दिली आहे. हिंदुस्थानच्या तात्काळ मदतीमुळे तुर्की भारावून गेला आहे.
तुर्कीचे हिंदुस्थानातील राजदूत फिरात सुनेल (Fırat Sunel) यांनी हिंदुस्थानच्या मदतीने भारावून जाऊन तुर्कीश भाषेत एक सुविचार ट्विट केला आहे. ‘दोस्त हा तुर्की आणि हिंदी भाषेतील समान शब्द आहे. आमच्याकडे एक म्हण आहे, संकटात मदत करतो तोच खरा मित्र. खुप खुप धन्यवाद’, असे ट्विट फिरात सुनेल यांनी केले आहे.
“Dost” is a common word in Turkish and Hindi… We have a Turkish proverb: “Dost kara günde belli olur” (a friend in need is a friend indeed).
Thank you very much 🇮🇳@narendramodi @PMOIndia @DrSJaishankar @MEAIndia @MOS_MEA #earthquaketurkey https://t.co/nB97RubRJU— Fırat Sunel फिरात सुनेल فرات صونال (@firatsunel) February 6, 2023
हिंदुस्थानची मदत पोहोचलीही
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपानंतर ट्विट करत शोक व्यक्त केला होता आणि आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर हिंदुस्थानने एनडीआरफचे एक पथक तुर्कीला पाठवले. त्याशिवाय ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी अत्यंत कुशल श्वान पथक हिंदुस्थानने आपल्या हवाई दलाच्या (IAF) विमानाने तुर्कीला रवाना केले. सोबत वैद्यकीय मदत, बचाव साहित्य, ड्रिलिंग मशीन सुद्धा पाठवून दिले आहे. यासह आणखी 100 जणांच्या पथकाला तयार राहण्यास सांगितले आहे.
पाकड्यांची आगळीक सुरुच
तुर्कीने कायम हिंदुस्थानला पाण्यात पहात आला असन कश्मीर मुद्द्यावरही या देशाने पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतली आहे. असे असतानाही हिंदुस्थानने संकटाच्या काळात तुर्कीला मदत पाठवली आहे. मात्र तुर्कीच्या मदतीसाठी हिंदुस्थानने पाठवलेल्या विमानाला एअर स्पेस वापरण्याची परवानगी दिली नाही. पाकिस्तानने त्यांचं हवाई क्षेत्र वापरण्यास परवानगी न दिल्याने भारतीय विमानाला लांबचा प्रवास करावा लागला, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तुर्कस्तानला मदत पोहोचवण्यात उशीर झाला.



























































