
सामना प्रतिनिधी, मुंबई
केबलचालकांकडून मुंबईकरांना विविध टीव्ही चॅनेलची सुविधा देताना धोकादायक केबल मात्र उघडय़ावर टाकल्या जातात. या धोकादायक केबलमुळे रहिवासी, पादचारी, वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे आता धोकादायक केबल जमिनीखाली टाकण्याकडे दुर्लक्ष करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शिवसेना नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी यासाठी पाठपुरावा केला.
टीव्ही केबल भूमिगत असणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईतील अनेक व्यावसायिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. केबल व्यावसायिक इमारती, झाडे, झोपडपट्टय़ांमध्ये बिनदिक्कतपणे उघडय़ावरून केबल सुविधा पुरवत असतात. या लटकणाऱ्या केबलबाबत संबंधित व्यावसायिकांकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जाते. या उघडय़ा केबल पादचारी, दुचाकीस्वार यांच्यासाठी जीवघेण्या ठरतात. शिवाय अनेक वेळा अपघात घडत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी पालिकेच्या महासभेत याबाबत ठरावाची सूचना मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या संदर्भात एक धोरण आणावे आणि केबलचालकांना भूमिगत केबल टाकणे बंधनकारक करावे, अशी मागणी मोरजकर यांनी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.
सर्व विभागांत कारवाई सुरू
सर्व सेवा उपयोगिता कंपन्यांना त्यांच्या केबल भूमिगत टाकण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार महानगर टेलिफोन निगम, बेस्ट यासह विविध वीज कंपन्या, मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या केबल भूमिगत टाकल्या आहेत, मात्र टीव्ही केबल व्यावसायिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सर्व विभागांत पाहणी करून कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.



























































