Twitter ने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट केलं बंद, वाद चिघळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Twitter आणि केंद्र सरकारमधील वाद अधिक चिघळत चालला आहे. नव्या IT नियमांवरून दोन्ही पक्षांमध्ये बरेचमतभेद आहेत. आता ट्विटरने केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं आहे. त्यांचं अकाऊंट तासभरासाठीच लॉक करण्यात आलं होतं. मात्र आता मंत्र्यांनी ट्विटरला लक्ष्य केलं आहे. ट्विटरनं आपली बाजू मांडताना म्हटलं आहे की मंत्री महोदयांनी कंपनीच्या पॉलिसीचं उल्लंघन केलं आहे.

माहिती तंत्रज्ञानमंत्र्याचं अकाऊंट सुमारे एक तास लॉक होतं. ट्विटरनं दावा केला आहे की मंत्र्यांनी पॉलिसीचं उल्लंघन केलं आहे. तासाभरानंतर मंत्र्यांचं अकाऊंट अनलॉक करण्यात आलं. ट्विटरनं यावर अद्याप अधिकृत काही उत्तर दिलेलं नाही. यासंदर्भात ट्विटरकडून उत्तर मागवण्यात आलं आहे, असं आजतकच्या वृत्तात म्हटलं आहे.

या घटनेनंतर आता ट्विटरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रविशंकर यांनी आधी देखील ट्विटरच्या नियमांना डबल स्डँडर्ड म्हटलं आहे. अमेरिकेसाठी ट्विटरचे नियम वेगळे आणि हिंदुस्थानसाठी वेगळे, असंही त्यानीही म्हटलं आहे. आता या घटनेमुळे दोन्ही पक्षात वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ट्विटरचा स्क्रीनशॉट रविशंकर प्रसाद यांनी Koo अॅपवर शेअर केला आहे. त्यानंतर त्यांनी ट्विटरवरच हे स्क्रीनशॉट शेअर केले. त्यात त्यांनी म्हटलं की ट्विटरनं तासाभरासाठी अकाऊंट लॉक केलं होतं.

रविशंकर प्रसाद यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘ट्विटरद्वारे करण्यात आलेली कृती ही कायद्याविरोधी आहे. ट्विटर थ्रेडमध्ये ते म्हणाले की ट्विटरचे हेतु योग्य नाहीत हे या कृतीवरून स्पष्ट झाले आहे.’