
कुर्ला रेल्वे स्थानकातील फुटओव्हर ब्रिजवरून चाललेल्या तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिचे चांदीचे ब्रेसलेट व चांदीची चेन हिसकावून पसार झालेल्या दोघा चोरटय़ांना कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
शहनाज खान ही मुलगी कुर्ला स्थानकातील फुटओव्हर ब्रिजवरून जात असताना पाठीमागून आलेल्या तरुणांनी तिला अडवले. तू झगडे की शूटिंग क्यूं बनाई, असे विचारत एका तरुणाने शहनाजचा मोबाईल बघायला घेतला. त्यानंतर तेथे असलेल्या दोन पत्र्याच्या रूममध्ये असलेल्या मोकळ्या जागेत नेऊन आरोपींनी तिला चाकूचा धाक दाखवला आणि शहनाजच्या हातातील चांदीचे ब्रेसलेट आणि गळ्यातील चांदीची चेन काढून पळ काढला. याप्रकरणी शहनाजने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गावीत तसेच करपे, घोडविंदे, शिंदे, गव्हाणे, महिला अंमलदार दळवी, चव्हाण आणि बागूल यांनी आरोपींचा शोध सुरू केला. खबऱयाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुर्ला कमानी परिसरातून रोहित सगर (20) याला पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आदित्य लोंढे या साथीदाराचे नाव सांगितले. पण गुन्हा केल्यानंतर आदित्यने सांगलीतल्या आपल्या गावी पळ काढला होता. गावीत व त्यांच्या पथकाने सांगली गाठून आदित्यला पकडून आणले. आरोपींकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.





























































