‘सांबर’ शिंगे विकायला आलेल्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांबर प्राण्याची दोन शिंगे विकण्यासाठी शीव येथे आलेल्या दोघांना गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. प्रत्येकी दोन किलो वजनाची ही शिंगे असून ती आरोपी कोणाला विकणार होते याचा पोलीस शोध घेत आहेत.

शीव येथील शेठ र. व. आयुर्वेदिक रुग्णालयाजवळ एक पुरुष व एक महिला सांबर प्राण्याची शिंगे विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची खबर युनिट-4 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक इंद्रजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार शर्माला निखाडे तसेच साळोखे, अजय बल्लाळ, संदीप तळेकर व पथकाने सापळा रचला. दरम्यान, त्या ठिकाणी ऑटो रिक्षातून एक पुरुष व एक महिला त्या ठिकाणी उतरले. महिलेच्या हातात एक सफेद रंगाची पॉलिथीनची गोणी होती. त्यात काही तरी संशयास्पद दिसत असल्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. महिलेकडील गोणीची तपासणी केली असता त्यात सांबर प्राण्याची दोन शिंगे मिळून आली. पोलिसांनी दोघांनाही अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.