सेंद्रिय खताचा अवैध साठा, मालवणात कंपनीच्या प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी, मालवण

कुंभारमाठ येथील एका घरात सेंद्रिय खताचा अवैध साठा केल्याप्रकरणी ग्लोबल पॉली अ‍ॅग्रो कोल्हापूर या कंपनीच्या दोन प्रतिनिधींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक प्रदीप ओहोळ यांनी पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओहोळ यांनी डमी ग्राहक बनून ग्लोबल पॉली अ‍ॅग्रो कोल्हापूर या कंपनीच्या ज्ञानेश्‍वर सोपान खंडागळे, अविनाश राजेंद्र सरवदे दोन्ही रा. कुंभारमाठ यांच्याकडे खताची मागणी करत काही रक्कम आगाऊ दिली. दुसर्‍या दिवशी 87 हजार रुपये किंमतीचे खत घेऊन जातो असे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी (14) ओहोळ हे खत घेण्यासाठी गेले असता त्यांना कुंभारमाठ येथील एका घरात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा साठा करून ठेवला असल्याचे दिसून आले. त्यांनी याठिकाणी छापा टाकत केलेल्या पाहणीत 9 हजार 520 किलोचे सेंद्रिय खत मिळून आले. त्यांनी या खताचे नमुने तपासणीसाठी वरिष्ठ कार्यालकाकडे पाठविले आहे.

सेंद्रिय खताचा साठा करण्यासाठी गोडाऊन घेणे आवश्यक असते त्यासाठीचा परवाना असतो. मात्र असा कोणताही परवाना नसताना एका घरात सेंद्रिय खताचा अवैध साठा केल्याप्रकरणी ओहोळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्लोबल पॉली अ‍ॅग्रो कोल्हापूर या कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर खंडागळे, अविनाश सरवदे या दोघांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 अन्वये येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर हे अधिक तपास करत आहेत.