
चालकाचा ताबा सुटल्याने होंडा सिटी कार दुभाजकावर उलटून विरुद्ध दिशेला जाऊन सोलापूरकडे जाणाऱया इनोव्हा कार आणि कंटेनरला धडकली. या विचित्र अपघातात कारमधील एका तरुणीसह एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर, पाचजण जखमी झाले आहेत. सोलापूर-पुणे महामार्गावरील माढा तालुक्यातील भोईंजे शिवारात ही घटना घडली आहे. जखमींवर टेंभुर्णी व पंढरपूर येथील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
माधुरी मल्लिनाथ चितकोटी (वय 30, रा. सोलापूर), सान्वी मयूर पाटील (वय 7, रा. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. होंडा सिटीतील कारचालक मयूर मल्लिनाथ पाटील (वय 33), संगीता मयूर पाटील (वय 30) व मीरा मल्लिनाथ चितकोटी (वय 3, रा. सोलापूर), तसेच इनोव्हा कारमधील सलीम अब्दुल सय्यद (वय 30) व दिलीप सायप्पा गायकवाड (वय 70, रा. सोलापूर) हे जखमी झाले आहेत.
होंडा सिटी कारमधील पाटील कुटुंबीय सोलापूर येथील वास्तुशांतीचा कार्यक्रम उरकून पुण्याकडे जात होते. भोईंजे गावानजीक कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावरून उलटून विरुद्ध दिशेला गेली. त्याच वेळी पुण्याकडून सोलापूरकडे निघालेल्या कंटेनरला व इनोव्हा कारला ही कार धडकली. अपघाताची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार अभिमान गुटाळ, हवालदार मकबुल तांबोळी, कॉन्स्टेबल प्रसाद काटे, तसेच मोडनिंब महामार्ग मदत केंद्रातील पोलीस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना टेंभुर्णी व पंढरपूर येथील रुग्णालयांत उपचारांसाठी पाठविले. सान्वी पाटील हिचा पंढरपूर येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आशीष शिवराज पाल (वय 23, रा. दुल्हापूर, ता. जि. मिर्झापूर) यांनी फिर्याद दाखल केली असून, मयूर मल्लिनाथ पाटील (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव तपास करीत आहेत.
































































