नागपूरमध्ये दोन कुजलेले मृतदेह आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूरच्या तात्या टोपे नगर येथे कुजलेल्या अवस्थेत दोन वृद्ध व्यक्तींचे मृतदेह राहत्या घरात आढळून आले. मोहन रंझुमल ओटवाणी ( 75) आणि शांता रंझुमल ओटवाणी अशी मृतांची नावे आहेत. दोघे बहीण–भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वृद्धापकाळाने दोघांचाही मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बजाजनगर पोलीस ठाणे हद्दीतील तात्या टोपे नगर परिसरातील घरात दोघे राहत होते.

मोहन ओटवाणी रेल्वेच्या नोकरीतून निवृत्त झाल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. दोघेही मृत बहीण-भाऊ घरातच राहायचे. घराबाहेर क्वचितच पडायचे तसेच घराला आतून कायम कुलूप लावलेले असायचे. घरात त्यांना कुत्रे पाळण्याचा छंद होता त्यामुळे त्यांच्याकडे कधीकधी 5-6 कुत्रे असायचे. मात्र सध्या त्यांच्याकडे एकच कुत्रा होता. त्यांच्यासोबतच कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. त्यांचा कुत्रा घरातील एका खोलीत मृतावस्थेत पडून होता. मोहनलाल यांचा मृत्यू सुमारे 5 दिवसांपूर्वी व बहिणीचा मृत्यू 3 दिवसापूर्वी झाल्याचा अंदाज आहे. मृतांना मुलंबाळ नव्हते किंवा कोणतेही नातेवाईकही संपर्कात नव्हते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.