कोलकात्यात पोलिसाचा गोळीबार, पोलिसासह महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलकात्याच्या पार्क सर्कस भागात गोळीबार करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा गोळीबार एका पोलिसाने केला आहे. या पोलिसाने हवेत बऱ्याच गोळ्या झाडल्या, ज्यातील एक गोळी एका महिलेला लागली. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. हवेत गोळीबार केल्यानंतर या पोलिसाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसाने त्याच्याकडे असलेल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने हा गोळीबार केला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या पोलिसाने हवेत जवळपास १० राउंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकताच लोकांची पळापळ झाली. तर दुकानदारांनी घाबरून आपले दुकानाचे शटर ओढून घेतले. यावेळी अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना घडण्या आगोदर पार्क सर्कस भागात भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्याला विरोध करण्यासाठी अनेक आंदोलकही जमले होते. त्यामुळे या जमावाचा या घटनेशी काही संबंध आहे का याबद्दल तपास करण्यात येत आहे.