एप्रिलपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथीच्या रोगाने दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टो, मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू या साथ रोगांचे १५८ रुग्ण आढळलेले आहेत. यातील एकाचा लेप्टोने तर अन्य एकाचा स्वाईन फ्लू साथ रोगामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती गुरुवारी झालेल्या आरोग्य समिती सभेत उघड झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नाथ पै सभागृहात सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे, सदस्य शर्वाणी गांवकर, उन्नती धुरी, श्रिया सावंत, जेरॉन फर्नांडिस, राजेश कविटकर, हरी खोबरेकर, लक्ष्मण रावराणे यांसह तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

एप्रिल पासून २९ लेप्टो, ५४ मलेरिया, ६१ डेंग्यू, १४ स्वाईन फ्लू अशाप्रकारे साथरोगाचे रुग्ण आढळले आहेत. यातील एक लेप्टो व एक स्वाईन फ्लू ने रुग्ण मृत झाला आहे. साथरोग अतिजोखमीच्या गावांत डॉक्सी सायक्लीनचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जोखमीच्या गावांत साथरोग माहिती देणाऱ्या भित्तिपत्रिका लावण्यात आलेल्या नसल्याचे सदस्य कविटकर यांनी सांगितले. वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनांसाठी स्थानिक आमदारांना प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले. तर मडुरे येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय मान्यता नसल्याने इमारत उभारणीला परवानगी मिळणार नसल्याचे डॉ खलीपे यांनी सांगितले. तसेच ३४२५ एवढ्या रॅबिज इंजेक्शन उपलब्ध असल्याचे डॉ खलीपे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या सफाईगार व वाहन चालक चा ठेका जिल्ह्या बाहेरील व्यक्तींना देण्यात येऊ नये, अशी मागणी करीत सभापती राऊळ यांनी हे ठेकेदार प्रामाणिक सेवा देत नाहीत. नियुक्त कर्मचारी यांचे मानधन अनेक महिने देत नाहीत. परिणामी हे कर्मचारी प्रामाणिक आरोग्य सेवा देत नाहीत, असे सांगितले. यावेळी आवश्यक असलेले बदल करून ठेकेदार नियुक्त करण्याची परवानगी मागण्यात आल्याचे डॉ खलीपे यांनी सांगितले.