एकाच वेळी घेता येणार दोन पदव्या; एकाच किंवा वेगवेगळय़ा विद्यापीठातूनही शिकण्याची मुभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकानंतर एक असे पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात. पण यापुढे तसे होणार नाही. विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. ते प्रत्यक्ष वर्गांमध्ये उपस्थित राहूनही करता येतील किंवा मग घरी राहून ऑनलाइनही शिकता येतील. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) तशी घोषणा केली आहे.

‘यूजीसी’चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी ही घोषणा आज केली. विद्यार्थी हे पूर्णवेळ अभ्यासक्रम एकाच विद्यापीठातून किंवा दोन वेगवेगळय़ा विद्यापीठातून करू शकणार आहेत. लवकरच त्यासंदर्भात नियमावली जाहीर केली जाईल, असे कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विद्यार्थ्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करता आली पाहिजेत असे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगते. त्यादृष्टीने यूजीसीने हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

ऑफलाइन किंवा ऑनलाइन शिकण्याची मुभा

एकाच वेळी दोन अभ्यासक्रम करण्यास परवानगी देतानाच विद्यार्थ्यांना ते अभ्यासक्रम ऑफलाइन किंवा ऑनलाइन अशा कोणत्याही पद्धतीने करण्याचीही मुभा यूजीसी देणार आहे. दोन-दोन अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्यांसमोर कदाचित उपस्थितीची अडचण उद्भवू शकेल. त्यावर उपाय म्हणून उपस्थितीची अनिवार्यता ठरवण्याचा निर्णय विद्यापीठांवर सोडण्यात येणार असल्याचे समजते.