‘आयपीएल’चा अंतिम सामना जीवघेणा ठरला, मद्यधुंद दुचाकीस्वारांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी, मुंबई

हैदराबाद आणि चेन्नई यांच्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर झालेला ‘आयपीएल’चा अंतिम सामना पाहून परतत असताना रिक्षाला झालेल्या किरकोळ धडकेच्या वादावरून प्रथम बाचाबाची आणि नंतर झालेल्या मारहाणीत रिक्षा प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री दहिसरमध्ये घडली. आयपीएलचा अंतिम सामना या प्रवाशासाठी जीवघेणा ठरला. या प्रकरणी दोघा मद्यधुंद तरुणांना अटक करण्यात आली. ही घटना मध्यरात्री दहिसर चेकनाका परिसरात घडली.

आयपीएलचा अंतिम सामना पाहून बोरिवलीमध्ये राहणारे यशोधर शेट्टी (५३) दोन मित्रांसह रिक्षाने घरी निघाले होते. मित्रांना दहिसर चेकनाका येथे सोडून ते घरी जाणार होते. दहिसर चेकनाका परिसरात त्यांची रिक्षा थांबली, मित्र उतरले आणि तितक्यात भरधाव दुचाकीने त्यांच्या रिक्षाला मागून धडक दिली. रिक्षाचालक आणि शेट्टी यांनी दुचाकीस्वारांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्याचे पर्यवसान बाचाबाचीत झाले आणि दुचाकीस्वारांनी शेट्टी यांना मारहाण केली.

हा प्रकार सुरू असताना गस्तीवर असलेल्या दहिसर पोलिसांचे वाहन तेथे पोहचले. पोलिसांना पाहून दुचाकीस्वारांपैकी एक पसार झाला. दुसऱयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात शेट्टी तक्रार देत असताना त्यांना उलटी झाली. त्यांना तातडीने भगवती रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या तरुणाला नंतर अटक करण्यात आली. या प्रकरणी दोघा तरुणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साहिल अरोरा आणि भूषण बनसोडे अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही दारूच्या नशेत होते.