खारफुटीच्या कत्तल प्रकरणी तीन आरोपी अटकेत, दोन डंपर जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधुकर ठाकूर । उरण

मातीचा भराव टाकून खारफुटीची झाडे नष्ट केल्याप्रकरणी उरण वनविभागाने गुन्हा दाखल करून तीन इसमांना रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणी दोन डंपरही जप्त करण्यात आल्याची माहीती उरण वनविभाग अधिकारी शशांक कदम यांनी दिली.

उरण तालुक्यातील रांजणपाडा ग्रामपंचायत हद्दीत रिलायन्स कंपनीच्या जागेत मातीच्या भरावाचे काम सुरु आहे. भरावाच्या कामात खारफुटीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याची खबर ग्रामस्थांनी उरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. ग्रामस्थांनी दिलेल्या खबरीनंतर गुरुवारी (६) वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास माती भरलेल्या दोन डंपरव्दारे खारफुटीच्याच झाडांवर माती टाकून कत्तल केली जात असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले.

वनविभाग अधिकार्यीच्या निदर्शनात प्रत्यक्ष पाहणीतच खारफुटीच्या कत्तलीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तत्काळ कारवाई करीत गुन्हा दाखल केला. तसेच दोन्ही डंपर चालकांसह एका सुपरवायझरलाही अटक केली. डंपर चालक मोहम्मद सद्दाम हसेन आणि हरिश्चंद्र यादव व सुपरवायझर संतोष निर्मल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन्हीही डंपर जप्त करण्यात आले असुन याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याची माहीती उरण वनविभाग अधिकारी शशांक कदम यांनी दिली.