
सामना प्रतिनिधी । परभणी
शहरातील पवनसुत नगर येथील दोन तरुणी ब्युटी पार्लरचे सामान आणण्यासाठी 5 एप्रिल रोजी घराबाहेर पडल्या. त्या परत आल्याच नाहीत. शोधाशोध करुनही मुलींचा शोध न लागल्यामुळे मुलींचे वडिल नारायण राठोड यांच्या तक्रारीवरुन अज्ञात इसमांनी अपहरण केले. अशा आशयाच्या तक्रारीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवनसूत नगरमध्ये ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणारी तरुणी संध्या नारायण राठोड (19) आणि शिक्षण घेत असलेली तिची बहिण संजना नारायण राठोड (16) या दोघींनी 5 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ब्युटी पार्लरचे सामान आणण्याचे कारण सांगून घराबाहेर पडल्या. या दोन्ही बहिणी घरात परत आल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु या मुलींचा शोध लागला नाही.
संध्या राठोड या मुलीचा रंग गोरा असून बांधा मध्यम, उंची 156 से.मी., अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात सँडल, मराठी, हिंदी व बंजारा आदी भाषा अवगत आहेत. तर संजना ही शिक्षण घेणारी मुलगी असून तिचाही रंगा गोरा, उंची 155 से.मी., अंगात काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, मराठी, हिंदी व बंजारा आदी भाषा अवगत आहेत. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास किंवा ठाव ठिकाणा लागल्यास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.एच. मलपिल्लू व आर.एस. तट यांच्याशी संपर्क साधावा आवाहन करण्यात आले आहे.



























































