
मुंबईत शनिवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत असतानाच चेंबूरमधील भीमटेकडी येथे रविवारी सकाळी दरड कोसळली. यात दोघे भाऊ जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर एकाला घरी जाऊ देण्यात आले असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक तपास चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
चेंबूरमधील वाशी नाका परिसरात भीमटेकडी आहे. या भीमटेकडीच्या खाली न्यू भारतनगर वस्ती आहे. आज सकाळी 6 वाजता बीएआरसीने बांधलेली संरक्षक भिंत ओलांडून दरड थेट वस्तीवर कोसळली. यात एक मोठा दगड थेट प्रजापती यांच्या दरवाजावर आपटला. त्यामुळे दरवाजा तुटला आणि आत झोपलेले अरविंद प्रजापती (25) आणि आशीष प्रजापती (20) हे दोघे भाऊ जखमी झाले. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार केल्यानंतर आशीष प्रजापती याला घरी सोडण्यात आले आहे तर अरविंद याची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या वस्तीवर काही अंतरावरच दरड कोसल्यामुळे 18 जणांचा मृत्यू झाला होता.
संरक्षक भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी
भीमटेकडी आणि आजूबाजूची जागा ही सरकारी मालकीची आहे. भीमटेकडीच्या खाली असलेल्या न्यू भारतनगर वस्तीवर दरडी कोसळू नये, यासाठी काही वर्षांपूर्वी बीएआरसीकडून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र, आज झालेल्या दुर्घटनेनंतरही संरक्षक भिंतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी येथील रहिवाशांनी केली असून ही भिंत अधिक सुरक्षित केली जावी आणि कोणाच्या जीवाला धोका पोहोचू नये, अशी रहिवाशांची मागणी आहे, अशी माहिती उपविभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिली.
महापालिकेकडून खबरदारीच्या सूचना
मुंबईत पावसाळ्याच्या तोंडावर टेकडी आणि डोंगरच्या पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिका नोटीस बजावून खबरदारीच्या सूचना देते आणि अतिधोकादायक वाटणाऱ्या ठिकाणांपासून रहिवाशांचे दुसरीकडे स्थलांतर करते. मात्र, अतिवृष्टीमुळे काही वेळा दरडी कोसळल्याच्या घटना घडतात. मुंबईत शनिवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.
बोरिवलीत आग, जीवतहानी नाही
बोरिवली पूर्वेला असलेल्या तवेरा टॉवरला शनिवारी रात्री साडेबारा वाजता आग लागली. सिद्धार्थनगरमध्ये 15 मजली इमारतीच्या 13, 14 आणि 15 मजल्याला आग लागली. सुरुवातीला लहान असलेली ही आग नंतर पसरली. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने पहाटे 3 वाजता ही आग नियंत्रणात आणण्यात दलाच्या जवानांना यश आले, अशी माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. दरम्यान, आगीचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास सुरू आहे.

























































