Pulwama चा बदला घेतला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन कमांडरचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gazi-abdul-rashid

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या दोन कमांडरचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. या चकमकीत हिंदुस्थानच्या एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. चकमकीत ठार केलेले दोन अतिरेकी हे जैश-ए- मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे कमांडर असल्याची माहीत मिळत आहे. ज्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले त्यात मास्टरमाईंड गाजी अब्दुल रशीद आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर कामरान असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याने अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हिंदुस्थानच्या सुरक्षा दलाने पिंगलान परिसरातील तीन किलोमीटर पर्यंतचा भाग घेरून तपासणी सुरू केली आहे. जवानांचा अतिरेक्यांना जिवंत पडण्याचा प्रयत्न होता मात्र त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा असल्याने अतिरेकी लपलेल्या इमारतीमध्ये स्फोट घडवून त्यांना ठार करण्यात आलं. घटनास्थळी गोळीबार थांबला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.