नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, वीज पडून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर जिल्ह्यासह ग्रामीण भागासर शहरी भागात दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाने नागरिकांची आडोसा शोधण्यासाठी पळापळ झाली. अवकाळी पावसात वीज पडून श्रीगोंदा तालुक्यात एक महिला तर कर्जत तालुक्यात एका मेंढपाळाचा मृत्यू झाला.

नगर शहरामध्ये सायंकाळनंतर ढगाळ वातावरण होते. नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस झाला. पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यातही पाऊस झाला. दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटासह पावसाने अचानकपणे हजेरी लावली. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तर कर्जत तालुक्यातील राशीन परीसरातील चिलवडी, बारडगावसह अनेक गावांमध्ये जोरदार वार्‍यासह पाऊस झाला. करमनवाडी येथे मेंढपाळ संभाजी पाटोळे हे अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाले.