वडगाव पोलिसांनी किणी येथे दोन लाखांचा गुटखा पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी ( ता. हातकणंगले ) येथे गुटख्याची वाहतूक करताना वडगाव पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा व टेम्पो असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी श्रीधर प्रताप सुर्वे (रा.घुणकी,ता.हातकणंगले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असून राज्यात ठिकठिकाणी संचारबंदी लागू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात संचारबंदी असून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वाहने आणि व्यक्तींना विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी वडगाव पोलिसांनी हद्दीतील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दादासो माने यांना किणी येथे एक टेम्पो गुटखा माल घेवून येत असल्याची माहिती मिळाली. हा टेम्पो पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास टाटा झिप टेम्पो या वाहनातून 2 लाख 16 हजार रुपये किंमतीचा गुटखा किणी येथील बौद्ध वस्तीजवळ आला असता दादासो माने यांनी सापळा रचून पकडला. याची नोंद वडगाव पोलिसात झाली असून पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा व गाडी असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू साठा करून वाहतूक केल्याप्रकरणी श्रीधर प्रताप सुर्वे (रा.घुणकी,ता.हातकणंगले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निशानदार अधिक तपास करत आहेत.