
राहुरी तालुक्यातील लाख-दरड गाव परिसरात भक्ष्याच्या शोधात दोन बिबटे विहिरीत पडले. त्यापैकी एका बिबट्याचा मृत्यू झाला तर दुसर्या बिबट्याला वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून जेरबंद केले आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून अनेक शेळ्या, कालवडी, कोंबड्या, पाळीव कुत्रे फस्त केली आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान भक्ष्याच्या शोधात असलेला एक नर व एक मादी बिबट्या सोमवारी रात्री दत्तात्रय शंकर गल्हे यांच्या विहिरीत पडल्याचे आढळून आले. सध्या कपाशी वेचणीचे काम चालू असून महिला मजुराकडून कापसाचे काटे घेत असता सायंकाळी विहिरीमध्ये बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने सोपान रघुनाथ गल्हे, दिनेश गल्हे व रावसाहेब शेळके यांनी विहिरीकडे जाऊन पाहिले असता त्यांना एक बिबट्या विहिरीतील पाईपला पकडून बसल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी तातडीने सदर घटनेची माहिती वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. साळुंके यांच्या आदेशान्वये वनपाल आर. एस. रायकर यांनी वनरक्षक आर. सी. आडगळे, बी. व्ही. सिनारे, एम. एस. शेळके, जी. पी. मोरे, पी. व्ही. शिंदे, वाहन चालक ताराचंद गायकवाड, मदतनीस शशिकांत मोरे व नंदू सिनारे आदींसह पथक घेऊन रात्री भर पावसात घटनास्थळी दाखल झाले.
ग्रामस्थांच्या सहकार्याने रावसाहेब शेळके यांचा ट्रॅक्टर घेऊन सुमारे तीन ते चार किलोमीटर चिखलामध्ये जाऊन प्रथम जिवंत असलेल्या बिबट्याला विहिरीमध्ये पिंजरा सोडून बाहेर काढले. तर मृत झालेल्या मादीला बाजेच्या साह्याने रात्री अकरा वाजता वरती काढण्यात यश मिळवले. यावेळी मृत मादी बिबट्याचे टाकळीमियाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव वाकडे यांनी पंचनामा केला. यावेळी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी लगतचे शेतकरी दादासाहेब शेळके, गणपत शेळके, रवींद्र खाडे, विठ्ठल काळे, चंद्रकांत गल्हे, अमोल आढाव, आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले


























































