हिरे व्यापारी हत्याकांड मॉडेल तरुणीसह दोघांना अटक आरोपींची संख्या सहा

सामना प्रतिनिधी । मुंबई

घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदाणी यांच्या हत्या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी मंगळवारी आणखी तिघांना अटक केली. उदाणी यांची हत्या व हत्येच्या कटात या तिघांचा सहभाग होता. त्यात एका मॉडेल तरुणीचा समावेश असून उदाणी यांचे अपहरण करण्यात आले त्या कारमध्ये तीदेखील होती. मंगळवारी केलेल्या कारवाईमुळे या प्रकरणात अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे.

उदानी हत्याकांड प्रकरणात आज पोलिसांनी पनवेलमध्ये राहणारा महेश प्रभाकर भोईर (31), निखत ऊर्फ झारा मोहम्मद खान (20) आणि सायिस्ता सरवर खान ऊर्फ डॉली (41) या तिघांना अटक केली. याआधी पोलिसांनी सचिन पवार, दिनेश पवार आणि प्रणीत भोईर या तिघांना अटक केली. यांच्या चौकशीत महेश, झारा आणि डॉली यांचादेखील सहभाग असल्याचे समोर आले. उदाणी यांचे अपहरण ज्या कारमधून करण्यात आले त्यात महेश आणि झारा हे दोघेसुद्धा होते. तर उदाणी यांची हत्या करण्याचा कट शिजला त्यात डॉलीचादेखील सहभाग होता. झारा ही मॉडेलिंगमध्ये नशीब अजमावत असून डॉलीची नातेवाईक आहे. डॉली ब्युटिशियनचे काम करते तर प्रणीत आणि महेश हे दोघे नातेवाईक आहेत. याप्रकरणी अजून तपास सुरू असल्याचे उपायुक्त अखिलेश सिंह यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या