
सामना प्रतिनिधी । हदगांव
नवीन संसार बहरत असतांनाच आंगावरील हळद वाळण्यापुर्वीच दोन नवविवाहितांनी एकाच दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना हदगांव तालुक्याती सायाळवाडी शिवारात रविवारी दुपारी घडली.
मृत सीमा बालाजी राठोड (१९) व निकीता राजू राठोड (२०) या दोघीही तरूणी शेजारच्याच महालींगी तांडा येथील रहिवाशी होत्या. कंधार तालुक्यातील धर्मापुरी माहेर असलेल्या या मुली नात्याने एकमेकींच्या आत्याभाच्या आहेत. म्हणजे सिमाच्या वडीलांची बहिण ही निकीता असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मे मध्ये कळमनुरी तालुक्यातील महालींगी तांडा येथील युवकांशी या दोघींचेही लग्न मोठ्या थाटात एकाच मांडवात लावण्यात आले होते. आज दोघीही दररोज प्रमाणे कपडे धुण्यासाठी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पण नांदेड जिल्ह्यातील सायाळवाडी शिवारातील तलावावर आल्या होत्या. आजूबाजूला कोणी नसल्याची वेळ पाहून बाजुलाच असवेल्या दुधीच्या वृक्षाला सोबत आणलेल्या एकाच दोरीने दोघीनीही गळफास घेवून आपले जीवन संपवले. या बाबत माहिती समजताच मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांनी घटना स्थळावर जावून पंचनामा केला व आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली. या दुहेरी आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून तपासाअंती सत्य समोर येईल असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ यांनी व्यक्त केला.
























































