संचारबंदीतही लाचखोरी; कळंबमध्ये प्रभारी दुय्यम निबंधकासह दोघे ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमिनीचे दस्ताऐवज करण्यासाठी दहा हजार रुपये लाच स्विकारल्याने प्रभारी दुय्यम निबंधक अमृत बंडगर यांच्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले.

या प्रकरणातील तक्रारदार दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात खरेदी विक्रीचे दस्त तयार करण्याचे काम करतात. तक्रारदारांनी धाराशिव जिह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथील पक्षकाराचे जमीन खरेदी खत दस्त बनवून अमृत पांडुरंग बंडगर, प्रभारी दुय्यम निबंधक, कळंब यांचेकडे सादर केले होते. त्यांनी पक्षकार वयोवृद्ध आहेत. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे कारण सांगून या कामासाठी पक्षकाराकडून दहा हजार रुपये लाचेची मागणी 8 एप्रिल 2021 रोजी केली होती. ही लाचेची रक्कम शुक्रवारी त्यांनी स्विकारली. बंडगर यांनी वाहनचालक विठ्ठल गोरोबा गहूदळे (38, रा. तांबरी विभाग धाराशिव) यांचेकडे रक्कम दिली. या कामात गणेश गोपीनाथ फावडे (40, रा. सावरगाव, ता. कळंब) यांनी प्रोत्साहन दिले आहे.ही रक्कम स्विकारताना पंचासमक्ष त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. याबाबत कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच दलालांचा सुळसुळाट असल्याचे सांगण्यात येते. या कार्यालयाशी संबंधीत लोक दलालाचे काम करत असून जनतेला लुटत असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे दलालांची साखळी उघडकीस येण्याची शक्यता आहे.