
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
उरण तालुक्यातील दिघोडे येथे झालेल्या आदिवासी महिलेच्या बलात्कार आणि हत्ये प्रकरणी उरण पोलिसांनी दोनजणांना अटक केली आहे. नरेश रामलू कोळी (42, रा. दिघोडे, मुळ गाव- मेहबुब नगर, हैद्राबाद) आणि अमितकुमार लालमनप्रसाद जैसवाल (22, रा. मोठेभोम, मुळगाव – मिर्जापूर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना सोमवारी कंठवली गावातील बेकरीजवळून पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिघोडे हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या निर्जन जागेवर 24 फेब्रवारीला अनुसया कातकरी (32) या महिलेवर बलात्कार करून तिची गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर आरोपींनी कुठलाही पुरावा हत्येच्या ठिकाणी ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी आपल्या खबऱ्यामार्फत माहिती काढून या दोन आरोपींना अटक केली. अनुसया कातकरी महिला ही कंठवली येथे वीटभट्टीवर काम करत होती. दिवसभर काम केल्यानंतर ती संध्याकाळी दिघोडे येथे घरकाम करण्यासाठी चालत जात असे. वाटेत हे दोघेही आरोपी तिची छेड काढत असत त्यामुळे ती त्यांना शिव्या देत असे. एक दिवस तिला धडा शिकवायचा या उद्देशाने या आरोपींनी या महिलेला निर्जन ठिकाणी अडवून तिला दारू पाजली आणि एका पडक्या घरात नेवून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा चिरून हत्या केली. विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह तसाच ठेवून सर्व पुरावे नष्ट करून ते पळून गेले होते.
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल अहेर, स.पो. निरीक्षक निलेश तांबे, गणेश कराड यांनी सातत्याने तपास करून खुनाच्या 15 दिवसांनतर दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.


























































