
पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी दरोडा, चोरी, जबरी चोरी करणाऱ्या सराईताला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल, 10 काडतुसे आणि मोटार असा एकूण 3 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुग्रीव अंकुश भंडलकर असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस ठाण्यातंर्गत महिलेच्या तक्रारीनुसार पोलीस तपास करीत असताना तिच्या पतीकडे पिस्तूलासह सहा काडतुसे मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली. चौकशीत त्याने बारामतीतील खांडज गावातील सुग्रीव भंडलकर याच्याकडून 40 हजारांना पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सुग्रीवला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बारामती शहर, बारामती तालुका, भिगवण, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, दरोडा घातल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून 2 पिस्तूल 10 काडतुसे जप्त करण्यात आली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, युसूफ पठाण, रोहिदास लवांडे, श्रीकांत शेडे, अमित कांबळे यांच्या पथकाने केली.































































