जळगावच्या कारागृहातून दोन कच्चे कैदी पळाले, स्वयंपाकघराच्या भिंतीवरून उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
thief-ran-jail

योगेश पाटील । जळगाव

जळगाव येथील जिल्हा कारागृहातून दोन कच्चे कैदी पळाल्याची घटना आज 5 डिसेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस ठाण्यात याप्रकरणी संपर्क केल्यावर कारागृह प्रशासनाची लेखी फिर्याद प्राप्त झाली होती. मात्र, ही फिर्याद घेऊन कारागृहाचे कर्मचारी परत गेल्याचे पोलीसांनी सांगितले.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील बिलवडी येथील शेषराव सुभाष सोनवणे (28) आणि बोदवड येथील रविंद्र भिमा मोरे हे दोन जण त्यांच्यावर चोरीच्या आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत कच्चे कैदी म्हणून 4 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले होते. स्वयंपाक घराच्या कामाची जबाबदारी या दोघांवर होती. आज सकाळी साडे पाच वाजता बराकीतून या दोघांना बाहेर काढण्यात आले. थोडा वेळ काम केल्यानंतर स्वयंपाक घराच्या भिंतीवरुन उडी मारून या दोन कैद्यांनी संधी साधून पळ काढला. जळगाव येथील जिल्हा कारागृहाचा कारभार नेहमीच वादात अडकला आहे. त्यातच दोन कैदी पळाल्याची घटना घडल्यामुळे कारागृहाच्या प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. जिल्हा कारागृह अधीक्षक अनील दांडेकर यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.