
सामना प्रतिनिधी । माहोरा
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील येवता येथील 2 सख्ख्या बहिणींचा मोळ तलावातील पाण्यात पाय घसरून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी १३ जुलै रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. मृत मुलींची नांवे किर्ती कृष्णा दळवी (14), संस्कृती कृष्णा दळवी (12) अशी आहेत.
येवता येथील मोळ तळ्याभोवती किर्ती दळवी व संस्कृती दळवी या शेळ्या चारीत होत्या. यावेळी अचानक किर्ती दळवीचा पाय घसरून ती तळ्यात पडली. यावेळी तिने आरडाओरड केल्याने संस्कृती दळवी तिच्या मदतीस धावली. मात्र पाणी खोल असल्याने किर्ती दळवी व संस्कृती दळवी यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






























































