
खासगी ट्रॅव्हल्समधून गुजरात राज्यातून आलेला सुमारे दोन टन बनावट खवा अन्न व औषध प्रशासनाने नगर शहरात जप्त केला आहे. सक्कर चौकातील एका पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. ऐन दिवाळीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट मिठाई तयार करण्याच्या पदार्थांचा साठा जप्त झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दिवाळीच्या तोंडावर मिठाई व रेडिमेड फराळासाठी मोठी मागणी असते. यात मिठाई तयार करण्यासाठी हलक्या प्रतीचा व आरोग्यास हानिकारक पदार्थांचा समावेश असलेला खवा गुजरातमधून आयात करण्यात आला होता, याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून हा बनावट खवा जप्त केला. 30-30 किलोंच्या बॅगमध्ये सुमारे दोन हजार किलो खवा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे नगर शहरातील चारजणांनी या मालाची मागणी केली असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून समोर आले आहे. आरोग्यास हानिकारक पदार्थ यात असल्याचे अधिकाऱ्य़ांनी सांगितले; तसेच हा माल नष्ट करण्यात येणार असून, दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही सहायक आयुक्त एस. पी. शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, सदर मालाची रितसर खरेदी केली आहे. आम्ही मालाची खरेदी करून विक्री करतो. त्याच्यात ते काय करतात, याच्याशी आमचा काय संबंध, असा सवाल सदर माल खरेदी करणाऱ्य़ांकडून कारवाईवेळी करण्यात आला. सहायक आयुक्त एस. पी. शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार, प्रदीप कुटे, नमुना सहायक प्रसाद कसबेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


























































