दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराशेजारील रस्त्यावर नातवाला सायकलवर बसवून चालत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील 4 तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री साडेदहाच्या सुमारास पुण्यातील वडगाव शेरीतील भारती कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी माधुरी वसंत पाटील (53) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वा दहाच्या सुमारास माधुरी त्यांच्या नातवाला सायकलवर बसवून परिसरात फिरवत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 4 तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसका मारून तोडून नेले. माधुरी यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.