वसमतमध्ये वीज पडून दोन महिला जागीच ठार

102

सामना प्रतिनिधी । वसमत

तालुक्यातील फाटा गावात आज 19 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट व मेघ गर्जनेसह पाऊस आला. वीज पडून शेतामध्ये काम करत असलेल्या  एक मुलगी व एक महिला ठार झाल्याची घटना घडली. या दोघीही जागीच गतप्राण झाल्या. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.

वसमत तालुक्यातील खांडेगाव- अकोली गावाजवळ फाटा हे गाव आहे. या फाटा गावातील शेतकरी महिला शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. आज 19 जुलै रोजी पाच वाजेच्या सुमारास अचानक वीज गर्जनेने सह पाऊस आल्याने काम करत असलेल्या लोचना नारायण काकडे (16) व प्रयागबाई प्रकाश काकडे (55) यांच्या अंगावर वीज पडून त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती फाटा गावातील नागरिकांना व शेतातील आजूबाजूच्या शेतकर्‍यांना समजताच घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी वसमत येथील पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर  तत्काळ वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन लोचना काकडे व प्रयागबाई काकडे या दोन महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केल्याची माहिती आहे. मात्र, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती. दरम्यान वसमत तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या