केडगाव दुहेरी हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण, अद्याप मारेकरी मोकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

नगर येथील केडगाव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असून आजपर्यंत या घटनेतील मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यात अपयश आलं आहे. सध्या या घटनेचा तपास सीआयडीमार्फत सुरू आहे.

6 एप्रिल 2018 रोजी नगर महानगरपालिका पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभर एकच खळबळ उडाली होती. यावेळी संतप्त झालेल्या लोकांनी केडगाव येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. या घटनेतील मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती. याच दिवशी रात्रीच्या सुमारास येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोललेल्या आमदार संग्राम जगताप यांची चौकशी सुरू झाली असताना या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला व या प्रकरणी 54 जणांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये रास्तारोको केल्याप्रकरणी ही कोतवाली पोलिसांनी 40 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या हत्याकांडाचा तपास एसआयटी मार्फत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी सुरुवातीला दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी या हत्येत सहभागी असल्याचे कबूल केले होते. यातील एक आरोपी हा पारनेर पोलीस ठाण्यामध्ये त्या दिवशी रात्री हजर झाला होता. त्याच्या ताब्यातून रिव्हॉल्व्हर व अन्य साहित्य सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले होते. या घटनेचा उलगडा होत असताना पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे .

केडगाव हत्याकांड घडल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगर येथे येऊन कोतकर व ठुबे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करू असे सांगितले होते. शिवसेनेच्या वतीने त्या दोन्ही कुटुंबांना मदत सुद्धा देण्यात आली होती तसेच दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभे राहील असा विश्वासही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

या प्रकरणामध्ये पकडलेल्या 9 आरोपींवर दोषारोपपत्र येथील न्यायालयामध्ये दाखल केले आहेत. या प्रकरणामध्ये संदीप कोतकर व अन्य काही जणांचा समावेश असल्याचे उघड झाले होते. मात्र पोलिसांकडून तपास योग्य पद्धतीने होत नव्हता. म्हणून कोतकर व ठुबे कुटुंबीयांनी या घटनेचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी केली होती.शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, यांनी सुद्धा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास लवकर लवकर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे सुद्धा केली होती.

त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. पण आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असताना अद्यापपर्यंत मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यात अपयश आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरणांमध्ये पकडलेल्या आरोपींना जामीन मंजूर झालेला आहे. मात्र आज हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झालेले असतांना देखील सुद्धा म्हणावा तसा तपास पुढे गेलेला नाही, असे चित्र आहे. या प्रकरणात सीआयडी तपास सुरू केल्यानंतर त्याला गती का मिळाली नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.