दरीत अडकलेल्या दोघांना सदाशिवगड प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वाचवले

391

किल्ले सदाशिवगडाचा रस्ता चुकल्याने सुमारे 300 फूट दरीत अडकलेल्या दोन मुलांना सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दोर टाकून सुखरूप बाहेर काढले. अर्धा ते पाऊण तासाच्या थरारनाट्यानंतर दोन्ही मुलांना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. हे दोघेही औंधमधील (ता. खटाव) येथील असून 15 ते 17 वर्षांचे आहेत. सदाशिवगडावर महाशिवरात्रीचा कार्यक्रम झाला. मावळा प्रतिष्ठानचे कायकर्ते नेहमीप्रमाणे गडावर गेले. तेथील सदाशिव गार्डनमधील झाडांना पाणी घालणे, मोटर विहिरीत सोडणे आदी कामे करून राहुल, उमेश, प्रथमेश व चंद्रजित हे गडावरून निघण्यासाठी निघाले. तत्पूर्वीच त्यांचे सहकारी सकाळी गड उतरून गेले होते. औंध येथील दोन युवक सदाशिवगड पाहण्यासाठी आले होते. उमेश त्यांच्या मागोमाग पायरी मार्गालगतच्या ध्वजापर्यंत पोचले होते. ते मंदिरात पाणी पिण्यासाठी पाच मिनिटे थांबले.

ध्वजाजवळ गेल्यावर एक व्यक्ती आणि त्यांच्यासोबत असलेला युवक आमची मुले दरीत अडकली आहेत, असे म्हणत राहुल, प्रथमेश व चंद्रजित यांच्याकडे धावत आले. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रथमेश रोप आणण्यासाठी मंदिराकडे गेले. तोपर्यंत राहुल पायरी मार्गाकडून त्या मुलांपर्यत पोचले. तितक्‍यात प्रथमेश धावतच रोप घेऊन आले. त्याच्यासोबत आनंदराव गुरव, बापू तिरमारे होते. 300 फूट दरीत मुले अडकल्याने उमेश जीव धोक्‍यात घालून दरीत उतरण्याचा प्रयत्न करत होते. धोका पाहून चंद्रजित, प्रथमेश व आनंदराव या तिघांनी रोप धरून उभे राहत कमरेस रोप बांधून बापूंना दरीत सोडले. थोड्याच वेळात बापूही मुलापर्यंत पोचले. दुसऱ्या बाजूने पांडुरंग भोई तेथपर्यंत पोहचले होते. दोघांपैकी एक मुलगा घाबरला होता. त्याला समजावत दोरीला धरण्यास सांगत दरीतून वर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. बापू, उमेश, पांडुरंग भोई मुलांना धीर देत होते. त्यांचा हात पकडून त्यांना सुखरूप गडावर आणण्यात आले. चंद्रजित पाटील यांना ट्रेकिंगचा छंद आहे. त्याशिवाय ते सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदाशिवगडाच्या संवर्धनासाठी झटत आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन मुले थोडक्यात बचावली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या