
कोणत्याही वाहनाचा टायर फुटणे ही देवाची करणी नसून तो वाहनचालकाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे, असं स्पष्ट करून मुंबई उच्च न्यायालयाने एका वीमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या कुटुंबाला आता 1.25 कोटी रुपये विमा परताव्याच्या रुपात मिळणार आहेत.
ही दुर्घटना 2010 मध्ये घडली होती. या दुर्घटनेचे बळी ठरलेले मकरंद पटवर्धन हे 25 ऑक्टोबर 2010 रोजी आपल्या दोन सहकाऱ्यांसह पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. या दरम्यान, गाडीचा पाठीमागचा टायर फुटला आणि गाडी अनियंत्रित होऊन खोल दरीत जाऊन कोसळली. या दुर्घटनेत मकरंद यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार दुर्घटना दावा न्यायाधिकरणाने दिलेल्या प्रत्येक दावेदाराला 2.25 लाख रुपयांच्या परताव्याच्या आदेशाला आव्हान देत न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या एकलपीठासमोर पार पडली.
या वेळी पटवर्धन कुटुंबीयांकडून मकरंद हे आपल्या घरातले एकमेव कर्ते व्यक्ती होते, त्यांच्या जाण्याने कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तर, विमा कंपनीकडून टायर फुटणे हे देवाची करणी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, तो युक्तिवाद अमान्य करत न्यायालयाने देवामुळे टायर फुटला हे मान्य केलं जाऊ शकत नाही, असं म्हणत युक्तिवाद अमान्य केला. वाहन सुरू करण्यापूर्वी टायर तपासून घेणं हे चालकाचं किंवा गाडीच्या मालकाचं काम होतं. त्याला दैवी कृत्य मानता येणार नाही. हा माणसाचा निष्काळजीपणा आहे. तसंच, टायर फुटण्याची अनेक कारणंही असतात. उदा. वेग, कमी किंवा जास्त फुगवणे, सेकंड हँड टायर, रस्त्याचं तापमान यांचा समावेश होतो, असं स्पष्ट करून न्यायालयाने विमा कंपनीला पटवर्धन कुटुंबीयांना 1 कोटी 24 लाख 60 हजार 960 रुपयांचा विमा परतावा देण्याचे आदेश दिले.

























































