जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना आवर घाला; उदय सामंत यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भूमीपुजन कार्यक्रमाच्या पत्रिकेत नावे नाहीत म्हणून जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून राजकारण व्हावे, यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. पंचायत समितीच्या नविन इमारतीत फक्त पदाधिकारीच जाऊन बसणार नाहीत तर अधिकारीही जाऊन बसणार आहेत, याचाही विचार करावा. जी पत्रिका छापली आहे ती उत्तम सावंत यांनी छापली आहे. त्यांनी त्याची जबाबदारी घेतली आहे. पण जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना आवर घाला असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला. ते मंगळवारी रत्नागिरी पंचायत समितीच्या नुतन इमारतीच्या भूमीपुजन समारंभाप्रसंगी बोलत होते.

भूमीपुजन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची नावे नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. अल्पबचत सभागृहासमोर रत्नागिरी पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे भूमीपुजन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, पंचायत समितीच्या सभापती संजना माने, उपसभापती उत्तम सावंत, जि. प. समाज कल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, महिला तालुका संघटक कांचन नागवेकर, सर्व पंचायत समिती सदस्य, जि. प.सदस्य आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
भूमीपुजनानंतर उदय सामंत यांनी सांगितले की, ९ कोटी रुपये खर्च करून पंचायत समितीची चांगली इमारत उभी राहणार आहे. हे ९ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी आपणही प्रयत्न केले आहेत. ग्रामविकास मंत्रालयाकडे सध्या अल्प प्रमाणात निधी असतानाही आम्ही प्रयत्न करून हा निधी आणला आहे. अशावेळी अधिकारी वर्गाने निमंत्रण पत्रिकेत नाव नाही म्हणून राजकारण करू नये. उपसभापती उत्तम सावंत यांनी ती निमंत्रण पत्रिका छापली. त्याची जबाबदारी ते घेणार आहेत. मात्र विकासाच्या कामासाठी अधिकाऱ्यांनी राजकारण न करता पुढे यावे असा सल्लाही त्यांनी दिला.

अलिकडेच राज्य शासनाकडून रत्नागिरी सिंधुदुर्गला रुग्णवाहिका देण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिका पोहोचल्या. मात्र रत्नागिरी जिल्ह्याच्या रुग्णवाहिका हातखंबा येथे थांबून होत्या. आपण स्वतः जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना फोन केला. त्यावेळी त्या रुग्णवाहिका हातखंबा येथे थांबल्या असल्याचे आपण सांगितले. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मला असे होणे शक्यच नाही कारण रुग्णवाहिका आपल्याला दिलेल्याच नाहीत असे उत्तर दिले. अशा सर्व प्रकाराबाबत सामंत यांनी नाराजी व्यक्त करताना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना आवर घाला असा सल्ला व्यासपिठावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.