झाडांची हत्या करणाऱ्यांची गय नाही! उद्धव ठाकरे यांचा सज्जड इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-new-pic

उद्याचे सरकार आमचेच आहे. त्यामुळे ‘आरे’तील झाडांची ज्यांनी हत्या केली त्यांचे काय करायचे ते आम्ही बघू. त्यांची बिलकूल गय करणार नाही, असा सज्जड इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ‘आरे’ हे जंगल नसल्याचा निर्वाळा देत शुक्रवारी सायंकाळी उच्च न्यायालयाने मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडे कापण्यास परवानगी दिली. त्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱयांनी रातोरात आरेतील 500 झाडांची कत्तल केली. याविरोधात मुंबईकरांमध्ये प्रचंड संताप आहे.

आज पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनीही आरेतील वृक्षतोडीविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, काल काय घडले, आज काय घडले याची माहिती घेऊन मला जे काही बोलायचे ते रोखठोक आणि खणखणीत बोलणार आहे. याबाबत लवकरच भूमिका मांडणार आहे. ‘आरे’ हा विषय मी सोडत नाही आणि सोडणारही नाही. झाडांची हत्या करणाऱ्यांची बिलकूल गय करणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

मेट्रोने केलेली कत्तल लज्जास्पद
रात्रीच्या अंधारात मेट्रो-3 साठी आरे कॉलनीत केलेली झाडांची कत्तल हा लज्जास्पद आणि तिरस्कार आणणारा प्रकार आहे, अशी टीका शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. झाडे तोडण्याचे काम तत्परतेने करणाऱ्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पीओकेत (पाकव्यात कश्मीर) पाठवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी सोपवावी, असे ठणकावत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

आरे कॉलनीत मेट्रो-3 चे कारशेड बनविण्यासाठी हजारो झाडे तोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर लगेचच मेट्रो प्रशासनाने शुक्रवारी रात्रीपासूनच आरेतील झाडे तोडण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केला. आदित्य ठाकरेंनीही लागोपाठ ट्विट करत मेट्रोच्या या कार्यतत्परतेचा चांगलाच समाचार घेतला. ‘आरेमध्ये सध्या जे सुरू आहे ते भयंकर आहे. काही पर्यावरणप्रेमी आणि शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे, शुभा राऊळ तसेच आमदार सुनील प्रभू आरेमध्ये ठाण मांडून आहेत. या वृक्षतोडीला ते विरोध करीत आहेत, पण प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पर्याकरण संकर्धनासाठी हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडलेली भूमिका मुंबई मेट्रो-3 मुळे धुळीस मिळाली आहे’ असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मेट्रोसाठी झाडे, वन्य जीवांना धोका
मुंबईकरांच्या विकासासाठी आणलेला मुंबई मेट्रो-3 हा प्रकल्प सर्वांदेखत अभिमानाने प्रत्यक्षात यायला हवा होता. पण रात्रीच्या अंधारात, प्रचंड पोलीस बंदोबस्तात या प्रकल्पाची वीट रचली जातेय. प्रदूषण कमी करण्याच्या नावाखाली जंगलावर बुलडोझर फिरवला जातोय. त्यामुळे आरेतील झाडे, बिबटय़ा, दुर्मिळ मांजरी यांसारख्या वन्य जीवांना धोका निर्माण झाला आहे. हे सर्वच खूप विचित्र आहे, असेदेखील आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

…तर प्लॅस्टिक प्रदूषणाविरोधात केंद्राने बोलूच नये
मुंबईतील एकमेव जंगलाचा परिसर अशा पद्धतीने उद्ध्वस्त केला जात असेल तर केंद्राने प्लॅस्टिकच्या प्रदूषणाविरोधात बोलूच नये. संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या हिंदुस्थानच्या भाषणातही काही अर्थ राहिलेला नाही, अशी बोचरी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईकरांना गुन्हेगारांसारखी वागणूक
मेट्रो प्रशासन मुंबईकरांना गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहे. मुंबईकरांना विकास हवा आहे. पण आरेतील विकासाची व्याख्या मुंबईकरांना पटणारी नाही, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.