नागरिकांनी मतदानाला उतरू नये, हा मोदी सरकारचा डाव; मतदान केंद्रांमधील दिरंगाईवरून उद्धव ठाकरे बरसले

मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर जाणून बुजून विलंब लावला जात आहे. यामागे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अत्यंत नीच आणि घाणेरडा खेळ खेळला जातोय, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. या मागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मतदान केंद्रांवरील दिरंगाईवरून निवडणूक आयोगाची आणि सत्ताधाऱ्याची सालटीच काढली. शिवसेना भवन येथे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली.

महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा आता एक दीड तासात थांबेल. संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध भागातील माहिती घेतोय. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला 10 ते 15 मसेजेस पाठवले जात आहेत. त्या प्रमाणे मतदार मतदानासाठी आले आहेत. खूप गर्दी दिसतेय. परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय, असं स्पष्ट दिसतंय. मतदारांमध्ये उत्साह आहे. पण निवडणूक आयोगात जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडून खूप दिरंगाई केली जात आहेत. विशिष्ट वस्त्या आहे तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत. यामुळे जे ज्येष्ठ मतदार आहेत, त्यांना उन्हामुळे खूप त्रास झाला आहे. इतरही मतदारांना त्रास झाला आहे. कुठे कसलीही सोय नाही. पिण्याचं पाणी नाही. तरीही मतदार रांगा लावून उभे आहेत. हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतोय. पक्षपातीपणा सुरू आहे. मतं नोंदवताना दप्तर दिरंगाई सुरू आहे. थोडा वेळ जारी राहिला असला तरी तुम्ही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका, असं तमाम नागरिकांना माझं आवाहन आहे. मतदान केंद्रात जाऊन उभे राहा. जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत, त्यांना आज कितीही वाजले अगदी पहाटेचे पाच सहा वाजले तरी तरी सोडू नका. तुमचा मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. आणि पोलिंग एजंटनाही सांगतो. जे मतदार मतदानासाठी जात आहेत, अशा कुठल्याही मतदान केंद्रामध्ये तुम्हाला मुद्दाम उशीर केला जातोय. त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा. तिथल्या निवडणूक प्रतिनिधींची नावंही तुम्ही विचारा. जेणे करून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायलायत दाद मागता येईल. उद्या त्यांची नावं माझ्याकडे आल्यावर पत्रकार परिषद घेऊन ती नाव आणि ठिकाणांसह माहितीच जाहीर करून टाकेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

तुम्ही मतदानाला उतरू नये, हा मोदी सरकारचा डाव आहे. त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल, ते बघताहेत. आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रात उभे राहा. कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभे असतील त्यांचे मतदान झाल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही. अगदी पहाटेचे पाच वाजले तरीही. मी तर म्हणतो मुद्दाम वाजवाच. तिथे जे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी विलंब लावताहेत, कारण नसताना तुम्हाला छळताहेत त्यांना तुमचं मतदान झाल्याशिवाय मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं.

जिथे आम्हाला मतदान अधिक होतं, त्या भागात आम्हाला या तक्रारी अधिक मिळत आहेत. अनेक वस्त्या आहेत, त्या वस्त्यांची नावं आली तर त्या उद्या पत्रकार परिषदेत जाहीर करेन. म्हणूनच त्या मतदान केंद्रातील जे निवडणूक प्रतिनिधी आहेत, त्यांचीही नावं विचारा, कारण तो आपला अधिकार आहे. ते आपलं मतदार ओळखपत्र विचारतात तेव्हा त्यांचंही ओळखप तुम्ही विचारलं पाहिजे. आणि त्यांची नावं नोंदवा, निवडणूक केंद्र सांगा जेणे करून उद्या कोर्टात जाता येईल, तक्रार करता येईल. उद्या मी ही यादी जाहीरच करेन, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मतदान करा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन

हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक आहेत. मोदी सरकार जे आहे ते, पराभवाच्या भीतीने पछाडलेले आहे. लोकांना करून द्या ना मतदान. मतदान करा… मतदान करा… यासाठी मला दिवसातून दहा वेळा मेसेजेस आलेत. आता काय त्यांना बोट दाखवत बसू. एवढं करून लोक उत्साहाने मतदानासाठी उतरलेत. रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत. सकाळी ज्यांनी मतदान केलं नसेल त्यांनी पुन्हा मतदान केंद्रात जाऊन उभं रहावं. शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत मतदान थांबत नाही. पहाटे पाच वाजले तरी चालतील त्यांना घरी सोडू नका. तुमचा मतदानाचा अधिकार बजवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे. काही काही ठिकाणी बोगस नावंही घुसवली असं कळलं आहे. त्यावर मी आता काही बोलणार नाही. तूर्त जो विलंब लावला जातोय, निवडणूक आयडी देऊनही तुमचं नाव काय, तुमच्या भावाचं नाव काय? विचारता. मग फोन आत नेऊ नका. म्हणजे मतदान करायला जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे की काय-काय घेऊन यायला पाहिजे. मोबाइल आणू नका, अमूक करू नका. फक्त बसल्या जागी तुम्ही बाजीरावपणा कशाला करताय? असा सवाल विलंब करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी केला.

Lok Sabha Election 2024 : मुंबईत पवई हिरानंदानीमध्ये मतदानाचा खोळंबा; EVM बंद पडल्याने आदेश बांदेकर यांचा संताप

आत गेल्यावर जो विलंब लागतोय, त्याला क्षमा करता येणार नाही. हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतंय की काय असं म्हणालया जरूर वाव आहे. अनेक ठिकाणी मतदान व्यवस्थित चाललं आहे. जिथे आमचा मतदानाचा टक्का आहे तिथे, म्हणजे शिवसेनेला मतं पडताहेत तिथे विलंब लावला जातोय. अशी मतदान केंद्र आणि तिथे बसलेल्या निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची नावं आणा. उद्या ते बूथ आणि त्यांची नावं मी पत्रकार परिषदे जाहीर करेन. त्याच बरोबर त्यांच्याबद्दल तक्रार करू आणि कोर्टातही जाऊ, असं बजावत उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला.