
मुंबईत शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाभेटींचा कार्यक्रम होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील विमानतळ परिसराला भेट देत जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबई आपली आहे, ती आपल्याचा ताब्यात ठेवा. आता झुकाल तर मुंबईला मुकाल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
आपण निवडणूक नाही, तर गद्दार आणि भ्रष्टाचाराच्या वृत्तीविरोधात लढत आहोत. छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या दैवतांचे पुतळे आज झाकले जात आहेत, आपली मराठी अस्मिता मारण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या भाषेवर आक्रमण होत आहे. ही गद्दारी आणि मह्राष्ट्रद्रोही वृत्ती आहे. या वृत्तीचा पराभव करण्यासाठी मशालीला मत द्यावे लागेल. निवडून दिलेले गद्दार निघतात, मात्र, निवडून देणारे कधीही गद्दार नाहीत, हे दाखवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे विजय आपलाच होणार, हा विश्वास असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून पैशांचा धुमाकूळ सुरू आहे. गद्दारी वृत्तीवाले निर्लज्जपणे पैसे वात आहेत. आपल्या आणि मनसेच्या काही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 1,2 आणि 5 कोटींची ऑफर देण्यात आली होती. आम्ही केलेल्या कामांच्या जोरावर मतं मागत आहोत, तुम्हीही कामे केली असतील तर ती दाखवा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरा. दाखवण्यासारखे त्यांनी काही केलेले नाही, मात्र, त्यांच्याकडे वाटण्यासाठी भरपूर आहे. आता पैसे वाटतानाही त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. आज आणि उद्याची रात्र त्यांचे पैसेवाटप सुरू राहणार आहे. त्यामुळे पैसे वाटताना कोणी दिसल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. ते लोकं 2,4,5 हजार रुपये वाटत असतील तर त्या पैशांसाठी स्वतःचे आयुष्य विकू नका. त्यामुळे कर्तव्याला चुकू नका, आता झुकाल तर मुंबईला मुकाल, मुंबई आपली आहे, ती आपल्याचा ताब्यात ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.




























































