निवडणूक घोटाळ्याविरुद्ध लढा उभारणार सरकारला घेरणार, इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्धार

देशाचे लक्ष लागून राहिलेली इंडिया आघाडीची बैठक आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पार पडली. निवडणूक आयोग व भाजप एकत्रितपणे करत असलेली मतचोरी व मतदार फेरपडताळणीच्या विरोधात लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. संसदेत व संसदेबाहेरही सरकारला घेरण्याची रणनीती बैठकीत ठरली.

‘इंडिया’च्या बैठकीत राहुल गांधी यांनी मतचोरीचे पुराव्यांसह सादरीकरण केले. निवडणूक प्रक्रियेतील हा घोटाळा आणि मतदार फेरपडताळणी या दोन्हीच्या विरोधात आवाज उठवण्याचे यावेळी ठरले. बिहारपासून याची सुरुवात होणार आहे. 17 ऑगस्टला राहुल गांधी बिहार दौरा करणार असून राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेऊन या घोटाळ्यांविरोधात रान पेटवणार आहेत.

उद्धव ठाकरे-सिब्बल यांची भेट

शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातून लवकरच अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार संजय राऊत व खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्यासह 50 नेत्यांची उपस्थिती

इंडिया आघाडीच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह 25 राजकीय पक्षांचे 50 नेते उपस्थित होते. यात तृणमूल काँग्रेस, नॅशनल कान्फरन्स, पीडीपी, सपा, राजद, भाकप, माकप व अन्य पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता.

उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार देणार

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीचा उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उमेदवार कोण असेल यावर आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.