
शिवसेना तेजाची मशाल घेऊन पुढे जात आहे. त्या मशालीच्या तेजात सर्व जळमटे, विरोधक भस्म होतील, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. ठाण्यातील एकनाथ शिंदे गटाचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
भाजप, मिंधे, अजित पवार गटातले अनेकजण आता शिवसेनेत येत आहेत. मध्यंतरी दिशाभूल झाल्यामुळे काहीजण शिवसेनेतून बाहेर गेले होते, तेदेखील आता परत येत आहेत. त्या सर्वांचे शिवसेना स्वागत करते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. धूळफेक करत काही शिवसैनिकांना स्वतःकडे खेचण्याचा गद्दारांचा प्रयत्न सुरू होता, मात्र आता सर्व धूळफेक उघड होत आहे. वातावरणात आणि राजकारणात प्रदूषण आहेच, पण आता शिवसेना विरोधकांची धूळफेक स्पष्ट होत आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांनी या वेळी एकनाथ शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, शिंदे यांनी गद्दारी करताना, उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, असे कारण दिले होते. भाजपच्या मंत्रिमंडळात आपण राहू शकत नाही, त्यासाठी राजीनाम्याची तयारीही दाखवली होती. त्यानंतर अजित पवार निधी देत नसल्याने यांच्यासोबत काम करू शकत नाही, असे कारण देण्यात आले. मात्र, आता तेच अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. त्यावेळी भाजपने विश्वासघात, दगाबाजी केली म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडी स्थापन केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याप्रसंगी शिवसेना नेते राजन विचारे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
भाजपवाले मारहाण करतात तरी मिंधे गप्प, ही लाचारीच!
नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिंधे गटाच्या पोस्टरवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे छायाचित्र आहे. त्यावरून त्यांची सर्व लाचारी सत्तेसाठी आहे हे दिसून येते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मिंध्यांना आता भाजपमध्ये काहीच किंमत नाही. फक्त नंबर एकला महत्त्व असते, नंबर दोनला काहीच महत्त्व नसते, असे भाजपवालेही सांगत आहेत. शिवसेनेचा आजही ठाण्यामध्ये दरारा आहे. मात्र, भाजप कार्यकर्ते मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करतात आणि ते काहीही करू शकत नाही. याला लाचारी नाही तर काय म्हणायचे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.






























































