
संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱयांना कर्जमुक्त नाही, तर चिंतामुक्त करणारी मोठी घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणाही विधानसभेत केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीसह नऊ महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मात्र त्याच वेळी शेतकऱयांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे बोट का दाखवता, असा सवाल करणाऱया भाजपलाही चार खडे बोल सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर्सची मदत देऊ शकतात; मग देशाचे पालक असलेले पंतप्रधान अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील शेतकऱयांना मदत देऊ शकत नाहीत का, असा रोकडा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. राज्यातील महाविकास आघाडीने केलेल्या दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी कोणतेही निकष नसून शेतकऱयांना अर्ज-विनंत्या कराव्या लागणार नाहीत आणि हेलपाटेही मारावे लागणार नाहीत. कर्जमाफीची रक्कम थेट खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये समाधान व्यक्त होत असून तब्बल 80 टक्के शेतकरी यामुळे ‘कर्जमुक्त’ होणार असल्याचा दावा या क्षेत्रातील जाणकारांनी केला आहे.
विदर्भ विकासावरील नियम-293चा प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या विकासाचे व्हिजन तर मांडलेच, पण शेतकरी कर्जमाफीसह नऊ मोठे निर्णयही घोषित केले.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मार्चपासून सुरू होईल. मधले दोन महिने यंत्रणेला तयारीला हवे आहेत. ही संपूर्ण योजना पारदर्शक असेल. यातला पैसा हा शेतकऱयाच्या कर्ज खात्यात थेट जमा होईल. मध्ये कुठेही त्याला अटी-शर्थीचा अडथळा येणार नाही. जास्तीत जास्त शेतकऱयांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. ही योजना मार्चपासून सुरू होईल. या हंगामाचे जे कर्ज आहे जे जूनमध्ये थकीत होईल ते पुनर्गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा पुढच्या अर्थव्यवस्थेला कोणताही अडथळा येणार नाही. जे शेतकरी कर्ज नियमितपणे परतफेड करीत आहेत त्यांच्यासाठीही सरकार आठ-पंधरा दिवसांत योजना तयार करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
विदर्भाचा मी नातू आहे
विदर्भाचा मी नातू आहे. कारण बाळासाहेबांची आई माझी आजी तिचं मूळ घर अमरावतीतील परतवाडय़ातलं. त्यामुळे विदर्भाकडून आजोळी जे प्रेम मिळतं ते प्रेम मिळत आलेलं आहे. आजोळ म्हटल्यानंतर मी विदर्भाच्या विकासात कुठेही कुचराई करणार नाही. माझ्या आजोळचे आशीर्वाद हा माझ्या आयुष्याचा ठेवा आहे. त्याच्यासाठी हे सरकार पूर्ण ताकदीने काम करेल, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.
सरकारी रकमेतून समृद्धी प्रकल्प उभारणार
विदर्भ विकासाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या समृद्धी प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे. हा महामार्गही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करीत आहोत. हा महामार्ग याआधी कर्ज घेऊन उभारला जाणार होता. आता राज्य सरकार तो स्वतःच्या रकमेतून उभारणार असून त्यामुळे व्याजापोटी जाणारे राज्याचे अडीच हजार कोटी रुपये या सरकारने वाचवले आहेत. नुसता महामार्ग होऊन चालणार नाही तर महामार्ग झाल्यानंतर समृद्धी आली पाहिजे, म्हणून महामार्गाच्या आजूबाजूला 20 नवनगरे कृषी समृद्धी केंद्रे म्हणून उभारणार आहोत. महामार्गाच्या माध्यमातून उद्योग, पर्यटन व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर वाढेल आणि या माध्यमातून विदर्भात पाच लाख लोकांसाठी रोजगारनिर्मिती होईल. हा प्रकल्प आम्ही कुठेही थांबवलेला नाही तर शिवसेनाप्रमुखांचं नाव दिल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. हे काम केवळ विदर्भाला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानात 200 रुपयांची वाढ
विदर्भात धान उत्पादक मोठय़ा प्रमाणावर आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने प्रोत्साहनपर राशीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मूळ किंमत आणि प्रोत्साहनपर राशी अशी त्यात अधिक 200 रुपयांची वाढ करीत आहोत. धान उत्पादक शेतकऱयाला एकूण 2500 रुपये मिळतील अशी तरतूद या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
आदिवासी भागातील कुपोषणग्रस्त भागात सेंट्रल किचन
मेळघाटसारख्या भागात वर्षानुवर्षे कुपोषणाची समस्या आहे. कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी पौष्टिक अन्न देण्याची गरज आहे. त्या आदिवासी मुलामुलींना पौष्टिक आहार देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू करू. यातून शारीरिक पोषणासाठी सकस आहार त्यांना मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
आदिवासींच्या विकासासाठी 500 कोटींची तरतूद
आदिवासींसाठी अनेक योजना आहेत. निधीची तरतूद करून तो निधी त्यांच्यापर्यंत पोहोचतो का हे तपासलं जात नाही. म्हणून आम्ही ठरवलं आहे की आदिवासी भागांच्या विकासासाठी त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात येईल. आदिवासींचा पैसा आदिवासींसाठीच खर्च केला जाईल, यावर आम्ही लक्ष ठेवू. वनहक्क कायद्यानुसार आदिवासींना ज्या जमिनी मिळाल्या आहेत. त्यावर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उपाययोजना करणार. अतिशय दुर्गम भागात आदिवासी राहतात यासाठी येथील रस्ते सुधारणार. आदिवासींच्या विकासासाठी स्पेशल पॅकेज म्हणून चालू आर्थिक वर्षात 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आवश्यकतेनुसार यामध्ये निधीची तरतूद करण्यात येणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
आरोग्यसेविकांना 1 जानेवारीपासून मानधनात 2000 रुपये वाढ
आरोग्य सुविधेत आशा वर्कर या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. गेली अनेक वर्षे त्या व्यथा मांडत आहेत. त्यांच्या मानधनात 2000 रुपये वाढवून देण्याचे आश्वासन आधीच्या सरकारने दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. शासन निर्णय निर्गमित केला गेला नाही. हा शासन निर्णय हे सरकार तत्काळ निर्गमित करून त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून केली जाईल.
ग्रामीण भागातील 81 लाख कुटुंबांना नळाद्वारे पाणी
ग्रामीण पाणीपुरवठा हा महत्त्वाचा विषय आहे. एक कोटी 32 लाख ग्रामीण कुटुंबांपैकी 50 लाख कुटुंबांकडे नळाद्वारे पाणी पुरवलं जातं. उर्वरित 81 लाख कुटुंबांना 2024 पर्यंत नळाद्वारे हे सरकार पाणीपुरवठा करण्यासाठी हे सरकार वचनबध्द आहे.
मिहान प्रकल्प फास्ट ट्रकवर राबवणार
मिहान प्रकल्पाला काही कमी पडू देणार नाही. विदर्भाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पात अद्याप काही उद्योग सुरू होऊ शकले नाहीत. याचा फेरआढावा घेऊन नवीन गुंतवणूकदारांना पाच वर्षांची मुदत देऊन रक्कम भरण्याची सवलत दिली जाईल. याठिकाणी पीपीपी मॉडेल राबवून फास्ट ट्रकवर हा प्रकल्प राबविला जाईल.
अवकाळग्रस्तांना मदत कमी पडू देणार नाही
अवकाळीबाबत तसेच कोल्हापूरच्या पुरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. त्याची रक्कम केंद्राकडून आलेली नाही. जीएसटीच्या परताव्यापोटी 15 हजार कोटींपैकी 4400 कोटी आले आहेत. उर्वरित रक्कम अद्याप आलेली नाही. केंद्र सरकारने मागील वेळी जशी पटपट मदत केली तशीच मदत करेल अशी अपेक्षा आहे. पण नाही केलं तर आम्ही तुम्हाला घेऊन केंद्राकडे जाऊच. अवकाळी पावसासाठी साधारणतः साडेसहा हजार कोटींचं वितरण केलं आहे. प्रलंबित असलेले साडेचौदा हजार कोटी केंद्राकडून आले तर भरघोस मदत देऊ शकतो. पण तोपर्यंत जी रक्कम ठरली आहे त्यात सरकार कुठेही कमी पडू देणार नाही. रस्त्यांसाठी केंद्राकडून मदत मिळाली तर ठीक, नाहीतर आपलं आपण करू
महामार्ग चांगले आहेत, पण त्यांना जोडणारे रस्ते खराब अवस्थेत आहेत. मोठी नगरे केली पण त्यांना जोडणारे रस्ते ठीक नसतील तर ते योग्य नाही. रस्त्यांची दुरवस्था विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे. राज्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. चालू असलेल्या हॅम योजनेत बँकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांकडून वित्तीय मदत घेऊन रस्त्याच्या सुधारणेला चालना देणार आहे. यात केंद्राकडून मदत मिळाली तर बघू, नाही मिळाली तर आपलं आपण करू. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा, असे तंत्रज्ञान मिळाल्यास राज्यातीलच नव्हे तर देशातील रस्त्यांचाही विकास होऊ शकेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
कामे स्थगितीने नाही तर गतीने पूर्ण करणार
गेल्या चार-पाच दिवसांत मी विदर्भातल्या जवळपास सर्व जिह्यांच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱयांची बैठक घेतली. वर्ध्याचीही बैठक घेतलेली आहे. नागपूरविषयीची बैठक मुंबईत घेणार आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची दखल सरकारने घेतली आहे. इथे जे लोकप्रतिनिधी बैठकांना हजर होते त्यांचे समाधान या बैठकीनंतर झालेलं आहे. जिथल्या तिथे निर्णय घेतलेले आहेत. विदर्भातील कामं अधिक गतीने पुढे कशी जातील, जी कामं चाललेली आहेत त्याची दखल घेऊन ती स्थगितीने नव्हे तर गतीने करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची ताकद या सरकारमध्ये
राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असेल नसेल किंवा कशीही असली तरी ती सुधरवण्याची ताकद आणि हिंमत या सरकारमध्ये आहे. ताकद, हिंमत असली तरी वस्तुस्थिती वस्तुस्थिती असते. सत्य सत्य असतं. सोंगंढोंगं कशाचीही आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणून मला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. हे नवीन धाडसाचं पाऊल आम्ही टाकत आहोत. मला सर्वांकडून सूचनांची आवश्यकता आहे. जिथे चुकत असू तर जरूर चुका दाखवा, पण जर मदतीचा हात पुढे केला तर तोही तुमच्याकडून मिळाला पाहिजे. कारण हे राज्य सगळ्यांचं आहे. हे राज्य केवळ सत्ताधाऱ्यांचं आहे आणि विरोधकांचं नाही असं नाही. जबाबदारी सर्वांची आहे. ही जबाबदारी सर्व मिळून पार पाडू. कारण 20व्या, 21व्या किंवा 22व्या कोणत्याही शतकात आपण गेलो तरी महाराष्ट्र हे देशातलं किंबहुना गुजरातपेक्षाही प्रगती झालेलं राज्य आहे. महाराष्ट्र हे नेहमीच नंबर 1वर राज्य ठेवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
- गोंदिया, भंडारा, चंद्रपूरमध्ये मोठय़ा प्रमाणावर भातशेती केली जाते ती वाढविण्यासाठी ब्राऊन राईस उद्योगाला विकसित करण्यासाठी भातशेती मिशन राबवणार. यामुळे कृषिप्रक्रिया उद्योग वाढेल.
विदर्भात तयार होणाऱया कापसाला मूल्यवर्धन करून रोजगार निर्मितीसाठी. सूक्ष्म, लघू, मध्यम कापूस उद्योगाला चालना देणार. - नागपूर संत्र्यासाठी ओळखले जाते. संत्रा उत्पादकांना मेहनतीचं फळ देण्यासाठी संत्रा उत्पादकांना बोलवून प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रयत्न करणार.
- शेतकऱयाचं उत्पन्न वाढवण्यासाठी अन्न-धान्य-फळे यासाठी अन्न प्रक्रिया क्लस्टरची स्थापना.
विदर्भात लोणार सरोवराचं सौंदर्य संमोहित करणारं आहे. जगामध्ये याप्रकारची चारच सरोवरं आहेत. या लोणार सरोवराची अवस्था काय आहे. त्या सरोवराची साफसफाई व्हायला हवी. ही आपली संपत्ती असून या संपत्तीचा वापर करायला हवा. यासह अन्य ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्यासाठी पर्यटकांना सुखदायक सुविधा उभारणार. त्यामुळे पर्यटनासह रोजगार उपलब्ध होणार. - निसर्गावर प्रेम म्हणून जिथे चांगली वनसंपदा आहे. नागपूरला आपण व्याघ्र राजधानी म्हणतो. इथे अनेक पर्यटनस्थळे आहे. ज्याप्रमाणे डेक्कन क्वीनमध्ये राज्यातील पशुपक्ष्यांची छायाचित्र आहेत. त्यानुसार अन्य राज्यांच्या रेल्वे आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील या वैभवाची छायाचित्रे असायला हवीत.
अमरावती, अकोला जिल्ह्यात खारपाण पट्टा मोठय़ा प्रमाणावर असल्याने हे पाणी प्यायल्यानंतर व्याधी निर्माण होतात. हे पाणी शुद्ध करून पिता येतं का याबाबतही विचार करीत आहोत. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलस्रोत निर्माण होतो का याचा शोध घ्यायला सांगण्यात आले आहे. इथल्या लोकांना पिण्यायोग्य पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. - नागपूरमधील कर्करोगाच्या रुग्णालयाचं काम सुरू आहे ते कोणत्याही परिस्थितीत न थांबवता त्यासाठी आवश्यक त्या सुविधा लवकरात लवकर पुरवून ठरलेल्या वेळेच्या आधी काम पूर्ण करणार.
- विदर्भ व राज्यातील काही ठिकाणी आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालयांचे काम निधी अभावी रखडले आहे. त्यासाठी आवश्यकत तो निधी उपलब्ध करून दिला जाईल व बांधकामे पूर्ण करण्यात येतील. गोंदियातील प्रलंबित विद्यालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करून वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणार.
- डॉ. बाबासाहेब रुग्णालय व अनुसंधान केंद्र नागपूर याचे श्रेणीवर्धन करून त्याला पीजी विद्यालयाची मान्यता दिली पण ती सुरू झाली नव्हती. त्याबाबत हे सरकार तत्काळ कार्यवाही करील.
- विदर्भात मत्स्यव्यवसाय मोठय़ा प्रमाणात आहे. याठिकाणी फिशरी हब उभारण्याची शक्यता तपासून योग्य असेल तर फिशरी हब स्थापन करण्यात येईल.
वचनपूर्ती! 10 रुपयांत शिवभोजन!!
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गोरगरीब रयतेचा राजा. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करीत गोरगरीबांना 10 रुपयांत शिवभोजन करण्याची योजना सुरू करीत आहोत. सुरुवातीला राज्यात 50 केंद्रे सुरू करण्यात येतील. त्यानंतर सूचना मागवून या योजनेचा राज्यभर कसा विस्तार करायचा ते पाहणार आहोत. लवकरात लवकर या केंद्रांचे उद्घाटन करणार असून त्या उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी यावे, असे आमंत्रणच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱयांसह विरोधकांनाही दिले. 10 रुपयांत शिवभोजन ही योजना जाहीर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती केली आहे.
- कर्जमाफी करताना आधार कार्डचा आधार
- जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना लाभ मिळणार
- कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची गरज नाही
- बँकांकडून शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती घेणार
कर्जमाफीची प्रक्रिया शेतकऱयांना समजावून सांगण्यासाठी एक फिल्म तयार करण्यात येईल आणि गावागावात जाऊन ही फिल्म दाखविण्यात येईल.
कोणत्याही अटींशिवाय शेतकऱयांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. कर्जमाफीचा पैसा बँकेला न देता शेतकऱयांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे.
कर्जमाफीची प्रक्रिया किचकट असणार नाही. अत्यंत सोपी अशी ही प्रक्रिया असेल.
आमदार, खासदार आणि शासकीय कर्मचारी वगळता सर्व शेतकऱयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
मार्चपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार असून शेतकऱयांना चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
1) महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या शेतकऱयांचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखापर्यंतचं थकीत कर्ज माफ केलं जाईल. तसंच जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात त्यांच्यासाठी येत्या 8 ते 15 दिवसांत नवीन योजना आणली जाईल.
2) राज्यातील गोरगरीबांसाठी 10 रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध व्हावी यासाठी ‘शिवभोजन योजना’ आणली जाईल. सुरुवातीला 50 ठिकाणी केंद्रे उघडली जातील.
3) मंत्रालय मुंबईत असल्यानं राज्यातील सर्वसामान्य लोकांना मुंबईचा हेलपाटा मारावा लागतो. हे हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून प्रत्येक विभागात ‘मुख्यमंत्री कार्यालय’ सुरू केलं जाईल.
4) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी घेतलेल्या कर्जाचे पैसे सरकारी तिजोरीतून दिले जातील. त्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांचे व्याज वाचेल. महामार्गालगत 20 कृषी समृद्धी केंद्रे उभारणार.
5) अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्याना आतापर्यंत 6,500 कोटींची मदत वितरीत करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडे 14 हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे.
6) आदिवासी बांधवांसाठी दरवर्षी बजेटमध्ये लोकसंख्येच्या आधारावर आर्थिक तरतूद केली जाईल. कुपोषणावर मात करण्यासाठी पौष्टिक आहारासाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर स्थापन करणार.
7) रस्त्यांच्या कामांसाठी आंतराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून नवीन स्रोत शोधू. केंद्राकडून काही मदत मिळाली नाही, तर राज्य कामं करेल.
8) नागपुरातील मिहान प्रकल्पाला कुठेही काहीही कमी पडू देणार नाही. पीपीपीच्या माध्यमातून प्रकल्प फास्ट ट्रकवर नेण्यात येईल.
9) राज्य सरकारनं कोणत्याही सिंचन प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही. राज्यातील 323 सिंचन प्रकल्पांचं काम सुरू असून, जून 2023 पर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण केले जातील. गोसेखुर्द पूर्ण करण्यासाठीही जो निधी लागेल तो दिला जाईल.
- यवतमाळ जिह्यातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी 253 कोटींचं पॅकेज
- पूर्व विदर्भात लवकरच एक मोठा स्टील प्रकल्प उभा केला जाईल
- अमरावती विभागातील प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करू.


























































